महिलांना मान-पाठ, मणक्‍यांचे आजार

Summer-Water-Shortage
Summer-Water-Shortage

उन्हाचा तडाखा आणि पाणीटंचाईच्या झळांनी गावं ग्रासलीत. भगिनींचा दिवसातील बहुतांश वेळ पाणीसंकलनात जातो. डोईवरून हंडे आणल्याने त्यांना मान-पाठ, मणक्‍यांच्या आजाराने ग्रासलंय. सुटीतील आनंद बाजूला ठेवत मुलंही पाण्यासाठी वणवण करतात. शुद्ध पिण्याच्या पाण्याचे कागदीघोडे नाचवण्यात यंत्रणा मग्न असताना साथीच्या आजारांची समस्या भेडसावते. पाणीटंचाईच्या गावांत मुली द्यायलाही लोक धजावत नाहीत. ‘सकाळ’च्या बातमीदारांनी घेतलेला मागोवा...

पाणीटंचाईच्या राजकारणातून खून
कोल्हापूर - पंचगंगा नदीतून बालिंगा वाहिनीद्वारे कोल्हापूरला पुरवठा होतो. परिसरातील १३ गावांचा पुरवठा केवळ गळतीमुळे होऊ शकत नाही. 
गांधीनगर, उचगाव, उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगावसह अन्य गावांना याचा फटका बसलाय. पाचगावात यापूर्वी टंचाईतून राजकरण झाले. दोन खून खटल्यातील अकरा जणांना याच महिन्यात जन्मठेप झाली.

पाणीटंचाईमुळे मुली देण्यास नकार
गौलखेड बाजार (ता. चिखलदरा) - सोनापूर आदिवासीबहुल सोनापूर तेराशे लोकसंख्येचे. येथील महिलांचे अर्धे आयुष्य पाणी भरण्यातच जाते. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न गंभीर आहे. आठवड्यापूर्वी गावात पाण्याचा टॅंकर न पोचल्याने नाईलाजाने ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावे लागले. ६५ जणांना अतिसार झाला. यात महिलांचा सर्वाधिक समावेश होता. गावविहिरीला पावसाळ्यात पाणी असते. त्यानंतर भटकंती सुरू होते. इथे मुली देण्यासही कोणी राजी होत नाही.

दिवस फक्त पाण्यासाठीच
येवला (जि. नाशिक) - दुष्काळी तालुक्‍यातील राजापूरमधील महिला ३२ वर्षे उन्हाळ्यात एकच काम करतात ते म्हणजे पाणी आणणे. जानेवारीनंतर पाणीपुरवठा योजना बंद पडली की, विहिरींवरून पाणी आणण्यासाठी उजाडल्यापासून भगिनींची भटकंती सुरू होते. टँकरचे पाणी मिळवण्यासाठीही कसरत होते. परिणामी महिलांच्या प्रकृतींच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

परतनदरावाडीची बारमाही पायपीट
नगर - आदिवासीबहूल परतनदरावाडीमधील (ता. अकोले) महिलांची पाण्यासाठी दोन ते अडीच किलोमीटर पायपीट चालते. तेथे एकच विहीर, पण उपश्‍याअभावी पाणी दूषित आहे. खोल दरीत उतरून डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्यातून पाणी आणावे लागते. पायपिटीमुळे भगिनींच्या तळपायाला जखमा झाल्यात.

जलस्त्रोत आटले
परभणी - जिल्ह्यात पालम, जिंतूर, पूर्णा आणि गंगाखेड तालुक्‍यात तीव्र टंचाई आहे. डोंगराळ भागातील वीस गावे आणि पाच वाडी-तांड्यांना २६ टॅंकरने पुरवठा होतोय.

धरण उशाला अन्‌ कोरड घश्‍याला 
माजलगाव (जि. बीड) - माजलगाव बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण. त्यासाठी जमिनी देणाऱ्या ११ खेड्यांतील रहिवाशी पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करतात. त्यामुळे धरण उशाला अन्‌ कोरड घश्‍याला, अशी अवस्था आहे. पुनवर्सित गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती असते. 

योजना असून नसल्यासारख्या
मंगळवेढा - चार साखर कारखान्यांच्या मंगळवेढा तालुक्‍यात पिण्याच्या पाण्यासाठी सरकारने तीन प्रादेशिक योजना राबवल्या. नंदूर आणि आंधळगाव निष्काळजीपणामुळे बंद; तर भोसे योजना कार्यान्वित होण्याआधीच गळती सुरू आहे. टंचाईच्या झळा सोळापेक्षा अधिक गावे, १४५ वाड्यावस्त्यांना कायम असते. 

अंधारवाडीत टॅंकरची प्रतीक्षा
हिंगोली - शहरालगतच्या अंधारवाडीत पाण्याच्या प्रश्‍नाने ग्रासलंय. विहिरीच्या बाजूला बसून महिला तासन्‌-तास टॅंकरची वाट पाहतात. दोन हजार लोकसंख्येच्या गावातील नळयोजना उद्भवाअभावी कुचकामी ठरली आहे. 

घुगेवाडीमध्ये मुली उतरतात विहिरीत
नांदेड : जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाडी-तांड्यावर अधिक आहे. घुगेवाडीमध्ये विहिरींमध्ये उतरून मुलींना पाणी भरून द्यावे लागते. बारा तालुक्‍यांतील २९ गावे आणि २८ वाडी-तांड्यावर ९० टॅंकरने पुरवठा होतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com