पाणी योजनेची स्थगिती उठली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेला गती

पुणे - शहराला २४ तास समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या योजनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या पाण्याच्या टाक्‍यांच्या बांधकामाला दिलेली स्थगिती राज्य सरकारने उठविली आहे. त्यामुळे आता या टाक्‍यांचे काम सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- भारतीय जनता पक्षाने या योजनेसाठी पुढाकार घेतला होता; तर काँग्रेसने त्याला विरोध केला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या या सुधारित आदेशामुळे २४ तास पाणीपुरवठ्याच्या योजनेचे काम वेग घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने सुमारे २९०० कोटी रुपयांची ही योजना हाती घेतली आहे. महापालिकेच्या मागच्या कार्यकाळात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या मदतीने ही योजना मंजूर केली होती. त्यानुसार तिचे काम सुरू आहे. या योजनेसाठी १५ टक्के पाणीपट्टीवाढ यंदाच्या आर्थिक वर्षापासून लागू झाली आहे. 

या योजनेअंतर्गत पाण्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी शहरात १०३ पाण्याच्या टाक्‍या बांधण्याचे नियोजन आहे. त्यातील ८३ टाक्‍या नव्याने बांधल्या जाणार आहेत. त्याचे काम गेल्या वर्षी सुरू झाले. मात्र, या योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे निविदाप्रक्रियेची तपासणी करण्यासाठी नगरविकास विभागाने १० मार्च रोजी टाक्‍यांच्या बांधकामाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठविण्यासाठी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यात याबाबत चर्चा केली होती. निविदाप्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याने स्थगिती उठवावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठविण्याचा आदेश दिला. त्याबाबतचे पत्र महापालिकेला मंगळवारी मिळाले. 

याबाबत नगरसेवक गणेश बिडकर म्हणाले, ‘‘शहराच्या हितासाठी भाजप या योजनेचा पाठपुरावा करीत आहे. या योजनेमुळे शहराच्या सर्वच भागांत समान व शुद्ध पाणीपुरवठा पुरेशा दाबाने होणार आहे. त्यामुळे पुणेकरांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने खोटे आरोप केले होते. प्रत्यक्षात त्या आरोपांत तथ्य नसल्याचे आढळल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठविण्याची कार्यवाही केली आहे.’’ पक्षीय राजकारणासाठी शहरहिताच्या प्रकल्पांत राजकारण आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

शहराच्या वेगवेगळ्या कालमर्यादा संपलेल्या सुमारे १५ टाक्‍या पाडून नव्याने उभारल्या जाणार आहेत. ८३ टाक्‍या ज्या ठिकाणी उभारणार आहेत, त्यापैकी ७० जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग