स्वारगेटचा ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी खुला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पुणे - स्वारगेटवरील केशवराव जेधे चौकातील ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी शुक्रवारी सकाळपासून खुला झाला. त्यामुळे जेधे चौकातील वाहतुकीचा ताण कमी झाल्याचे चित्र दिसून आले. 

पुणे - स्वारगेटवरील केशवराव जेधे चौकातील ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी शुक्रवारी सकाळपासून खुला झाला. त्यामुळे जेधे चौकातील वाहतुकीचा ताण कमी झाल्याचे चित्र दिसून आले. 

शंकरशेठ रस्त्यावरील पीएमपी इमारतीपासून नेहरू स्टेडियमपर्यंत सुमारे 580 मीटर लांबीचा ग्रेडसेपरेटर आहे. त्याची रुंदी 7.5 मीटर आहे. तर 6 मीटरची उंची आहे. या ग्रेडसेपरेटरमुळे शंकरशेठ रस्त्यावरून नेहरू स्टेडियमपर्यंत ग्रेडसेपरेटरमधून पोचणे वाहनचालकांना सहज शक्‍य होणार आहे. शंकरशेठ रस्त्यावरून येणारी वाहने थेट सारसबागेपर्यंत पोचत असल्यामुळे जेधे चौकातील वाहतुकीचा ताण कमी झाल्याचे दिसून आले. या ग्रेडसेपरेटरमध्ये विद्युत व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे अकाली निधन झाल्यामुळे महापालिकेने कोणताही औपचारिक कार्यक्रम न करता ग्रेडसेपरेटर वाहनांसाठी खुला केला, अशी माहिती महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली. या ग्रेडसेपरेटरमधून जड वाहनांचीही वाहतूक शक्‍य आहे, असे त्यांनी नमूद केले. 

जेधे चौकातील उड्डाण पुलाच्या प्रकल्पात ग्रेडसेपरेटरचा समावेश आहे. पुलाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. आता स्वारगेट चौकातील पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी नमूद केले. स्वारगेट चौकातील या प्रकल्पासाठी महापालिकेने एकूण 170 कोटी रुपये खर्च केले असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प साकारण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागली आहेत.