शहरातील जलतरण तलावांवर वरकमाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पिंपरी - उन्हाळा सुरू झाल्याने शहरातील जलतरण तलावांवर जीवरक्षक, लिपिक आणि सुरक्षारक्षकांची ‘वरकमाई’ सुरू झाली असून जीवरक्षकांकडून शिकाऊ मुलांना भाड्याने फ्लोटर आणि शॉट्‌स दिल्या जात आहेत, तर सुरक्षारक्षकांनी ‘ऑन ड्यूटी’ स्वतःचा प्रशिक्षण वर्गाला सुरवात केली आहे. 

पिंपरी - उन्हाळा सुरू झाल्याने शहरातील जलतरण तलावांवर जीवरक्षक, लिपिक आणि सुरक्षारक्षकांची ‘वरकमाई’ सुरू झाली असून जीवरक्षकांकडून शिकाऊ मुलांना भाड्याने फ्लोटर आणि शॉट्‌स दिल्या जात आहेत, तर सुरक्षारक्षकांनी ‘ऑन ड्यूटी’ स्वतःचा प्रशिक्षण वर्गाला सुरवात केली आहे. 

दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरीस जलतरण तलावांवर मोठी गर्दी उसळते. शहरातील सुमारे १३ जलतरण तलावांवर अनेकदा त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त संख्येने नागरिकांना पोहण्यास सोडणे भाग पडते. यंदाही उन्हाळा कडक असल्याने तलावांवरील संख्या वाढली आहे. त्यात नवशिकाऊ मुले-मुलींचेही प्रमाणही जास्त आहे. त्याचा गैरफायदा घेत तलावांच्या सुरक्षारक्षकांनी सकाळच्या वेळेत स्वतःचे जलतरण प्रशिक्षण वर्गच सुरू केले आहेत. नेहरूनगर येथील जलतरण तलावांवरील जीवरक्षकांनी नवशिकाऊ व्यक्तींना शॉट्‌स भाड्याने देण्यासाठी नवीन सुमारे ३० शॉट्‌सचा ‘स्टॉक’ खरेदी केला आहे. तसेच तिथे ६० ते ८० फ्लोटर्स आहेत. या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडून प्रत्येक बॅचला प्रत्येकी १० रुपये याप्रमाणे भाड्याने दिले जात आहेत.

सुरक्षारक्षकांकडून प्रत्येक प्रशिक्षणामागे प्रति व्यक्ती एक हजार रुपयांची ‘वरकमाई’ केली जात आहे. मात्र, शॉट्‌स भाड्याने दिल्यावर त्या साबणाने न धुता तशाच तलावाच्या डेकवर वाळत ठेवल्या जातात. सुकल्यावर त्यांचा परत पुढच्या बॅचला वापर केला जातो. त्यामुळे, त्वचेचे संसर्गजन्य आजार होण्याची भीती आहे.

शहरातील जलतरण तलावांचे जागेवरच लेखापरीक्षण (स्पॉट ऑडिट) करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. परंतु, त्यासाठी अद्याप दक्षता पथकाची नेमणूक झाली नाही. दक्षता पथक कार्यान्वित झाल्यास तलावांवरील गैरप्रकार आणि चुकीचे व्यवस्थापनाचे प्रमाणाला आळा बसू शकेल.
- क्रीडा विभाग, महापालिका

Web Title: swimming tank income