bhosari
bhosari

नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - आ. महेश लांडगे

भोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकरणामुळे शहरातून वाहणा-या नदीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहून नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. डिसेंबर अखेर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन, कारवाई करा असे आदेश आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच जे अधिकारी कामात कुचराई करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. 

आमदार महेश लांडगे यांनी आज (सोमवारी) भोसरी मतदार संघातील आणि शहरातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत विविध प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश अधिका-यांना दिले आहेत. महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, इ प्रभागाच्या अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण  उंडे, कुंदन गायकवाड, माजी नगरसेवक सुरेश धोत्रे, शांताराम भालेकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह आयुक्त मंगेश चितळे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. 

नदी प्रदूषण रोखण्यासाठी आराखडा तयार करा. नदीला जोडणारे उद्योग धंद्याचे नाले, ड्रेनेजचे नाले हे शोधण्याचा सर्वेक्षण त्वरित पूर्ण करा. निर्धारित वेळेत नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करा. नदी प्रदूषण रोखण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करा. जे अधिकारी कामात कुचराई करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. औद्योगिक पट्ट्यातील प्रदूषित रसायनमिश्रीत पाणीनदीत सोडण्यात येत आहे. त्यासंदर्भात तातडीने एमआयडीसीकडे बैठक लावा. चाकण हद्दीतील उद्योग धंद्यातील रसायनममिश्रीत सोडणात येणा-या पाण्याबाबतही बैठक लावण्यात यावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली आहे.  

नदीपात्राचे डिमार्केशन करुन मुख्य नदीपात्रातील वर्षानूवर्ष साचलेला गाळ काढून नदीपात्र पूर्व स्थितीत आणावे. नदी पात्राच्या कडेने खालील पातळीस गॅबियन पद्धतीची भिंत बांधावी. नदीस मिळणारे सांडपाणी रोखण्यासाठी नदीपात्राच्या कडेने आरसीसी पाईपलाईन टाकून आवश्यक त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन करून ते सांडपाणी नजीकच्या मैलाशुद्धीकरण केंद्रात पाठविण्यात यावे. ज्या नाल्यामध्ये हे शक्य नाही, तेथे शुद्धीकरणासाठी छोटे मोड्युलर प्लॅन्ट बसवून सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यात यावे. नदीच्या कडेने वृक्षारोपण करावे. सायकल मार्ग विकसित करण्यात यावेत.

आवश्यकता संपलेले बंधारे तोडून बंधा-याचे मजबुतीकरण करणे, आवश्यकतेनुसार बंधारे उघडण्यासाठी गेट बसविणे. नदीच्या कडेने पदपथ तयार करणे, नदीकडेला स्वच्छातागृह, स्माशानभूमी व धोबीघाट विकसित करणे, उद्याने, मनोरंजनाची केंद्र उभारण्यात यावीत, असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. पाण्याचे नियोजन वेळेत करावे. पाणी गळती रोखण्यासाठी चिखली ते च-होली परिसरातील सर्व ठिकाणची गळती तपासून घेण्याच्या सूचना देखील आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com