भाजपकडून पहिली यादी जाहीर

भाजपकडून पहिली यादी जाहीर

तळेगाव दाभाडे - नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, जनसेवा विकास समिती आणि रिपब्लिकन पक्ष युतीतील जागावाटप निश्‍चित झाले असून, चौदा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह 26 जागांपैकी भाजपला 20, जनसेवा समितीला पाच, तर रिपब्लिकन पक्षाला एक जागा देण्याचे ठरले आहे. स्वीकृत सदस्य जागा वाटपाबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर चर्चा करून घेण्यात येणार आहे. भाजपचे आमदार बाळा भेगडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी असताना घरच्या मैदानावर होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत या वेळी सहा जागांवर कमळ चिन्ह न घेता निवडणूक लढविण्याची तडजोड पक्षाने स्वीकारली आहे.

भाजप युतीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीवर संस्थापक बाळासाहेब काकडे, कार्याध्यक्ष रवींद्र आवारे, निमंत्रक चंद्रभान खळदे, भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उमेदवारीत भाजपचे शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील), विरोधी पक्षनेते सुनील शेळके व नगरसेवक सुशील सैंदाणे तर समितीच्या माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे यांचा समावेश आहे. शिक्षण मंडळ बरखास्ती व स्वीकृत सदस्य निवडीची शाशंकता, यामुळे इच्छुकांची नाराजी दूर करून उमेदवारी जाहीर करताना पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करण्याची वेळ आल्याने उमेदवारी यादीला विलंब होत असल्याची चर्चा आहे.

जाहीर यादीनुसार प्रभाग एकमधून भाजपने सर्वसाधारण जागेसाठी पक्षाचे दिवंगत माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचे धाकटे बंधू संदीप बाळासाहेब शेळके व सर्वसाधारण महिला जागेसाठी कल्पना सुरेश भोपळे यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग दोनमधून विद्यमान नगरसेवक सुशील ऊर्फ विजय ज्ञानेश्वर सैंदाणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग-भाजप), विभावरी रवींद्र दाभाडे (सर्वसाधारण महिला-भाजप), प्रभाग तीनमधून संग्राम
बाळासाहेब काकडे (समिती- सर्वसाधारण), अनिता अनिल पवार (अनु.जाती महिला-रिपब्लिकन पक्ष), प्रभाग चारमध्ये सुलोचनाताई गंगाराम आवारे (सर्वसाधारण महिला समिती), प्रभाग पाचमधून नीता अशोक काळोखे, (सर्वसाधारण महिला-भाजप), संतोष आनंदा शिंदे (नागरिकांचा मागासप्रवर्ग भाजपा), प्रभाग सहामधून हेमलता चंद्रभान खळदे (सर्वसाधारण महिला समिती), प्रभाग सातमधून सुनील शंकरराव शेळके (सर्वसाधारण भाजप), काजल प्रदीप गटे (नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला भाजपा), प्रभाग नऊमधून संदीप सुरेश चव्हाण (अनु. जाती भाजप), प्रभाग दहामधून संतोष हरिभाऊ दाभाडे (सर्वसाधारण भाजप) यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 8, 11, 12 व 13 यातील एकही उमेदवार अद्याप निश्‍चित झालेले नाहीत. उमेदवारी जागावाटपावरून सध्यातरी जनसेवा विकास समिती केवळ स्टेशन विभागामधून जागा लढवीत असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com