तळेगावातील आरपीएफची चौकी बंद 

तळेगावातील आरपीएफची चौकी बंद 

तळेगाव स्टेशन - लोहमार्गावरील सुरक्षेच्यादृष्टीने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवरील आरपीएफची चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंद आहे. त्यामुळे देहूरोड ते मळवलीदरम्यानच्या मार्गावरील रेल्वेची मालमत्ता, लोहमार्गासह प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. 

रेल्वे पुणे सुरक्षा मंडळाच्या अंतर्गत मंजूर सहापैकी तळेगाव वगळता जवळपास इतर चौक्‍या कार्यान्वित झाल्या आहेत. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) देहूरोड रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर उभारलेली चौकी दोन महिन्यांपासून अधिक काळ बंदच आहे. तळेगाव चौकीसाठी एक उपनिरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली; परंतु कोणीही रुजू झाले नसल्याचे कळते. शेलारवाडी, घोरावाडी, तळेगाव, वडगाव मावळ, कान्हे, कामशेत आणि मळवली या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे सुरक्षा बल प्रभावी नाही. त्यामुळे अवैध फेरीवाले, गुन्हेगारी, लोहमार्गावरील गस्त आणि अपघातांवर नियंत्रण राहिलेले नाही. रेल्वेच्या मालमत्तेतील भंगार आणि इतर साहित्याच्या चोरीच्या घटनाही दडपून टाकल्या जातात. देहूरोड रेल्वे सुरक्षा बल ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी चोरीची माहिती देण्यास टाळाटाळ करतात. काही अनुचित घटना घडल्यास माहिती देण्या-घेण्यासाठी थेट पुण्यातील कार्यालयात संपर्क साधावा लागतो. याबाबत रेल्वेचे मंडळ सुरक्षा आयुक्त विकास ढाकणे आणि उपनिरीक्षक कुजूर यांना फोनवर विचारले. मात्र, त्यांनी माहितीसाठी आपणास पुण्यात यावे लागेल, असे उत्तर दिले. सदर पोलिस चौकी त्वरित कार्यान्वित करावी, अन्यथा रेल्वे प्रवासी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

अतिक्रमणांना अधिकाऱ्यांचे अभय 
रेल्वे सुरक्षा बल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अतिक्रमणे आणि अवैध धंदे फोफावले आहेत. हफ्तेखोरीचा आरोप होतो. तळेगावच्या ब्रिटिशकालीन पुलाजवळ अतिक्रमणांतून लोहमार्गावर कचरा फेकला जातो. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. मदत अथवा माहितीसाठी रेल्वे सुरक्षा बलास प्रवाशांनी फोन केल्यास बहुतांश वेळा लॅंडलइनचा फोन उचलला जात नाही. रेल्वे सुरक्षा बलाचे कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकारी कर्मचारी प्रवाशांशी अरेरावी करतात. त्यामुळे दाद कुणाकडे मागायची ? हा प्रश्न प्रवाशांसमोर आहे. 

राष्ट्राची जीवनरेखा म्हणून सेवा देणाऱ्या रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचे प्रवाशांशी बोलणे नीट नाही. प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाने तळेगाव दाभाडे स्टेशनवरील पोलिस चौकी त्वरित कार्यान्वित करावी; अन्यथा आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. 
पोपट भेगडे, अध्यक्ष, मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com