बोथट समाजमनाला स्त्री संवेदनेचे अंजन

बोथट समाजमनाला स्त्री संवेदनेचे अंजन

तळेगाव स्टेशन - रस्त्याने भटकणाऱ्या मनोरुग्णांकडे दुर्लक्ष करण्याची समाजाची बोथट मानसिकता अनेकदा बघायला मिळते. याचीच प्रचिती तळेगाव दाभाडे बाजारपेठेत अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या मनोरुग्ण तरुण स्त्रीबद्दलही आढळली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी यंत्रणेच्या ‘सरकारी’ वृत्तीचा कटू अनुभवही समाजसेविकांना आला. त्यामुळे नाउमेद न होता सर्व सोपस्कार पूर्ण करून त्यांना अखेर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात यश आले.

तळेगाव स्टेशन परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून मनोरुग्ण महिला भटकत होती. तिची हेळसांड न पाहवल्याने तिचे मन जिंकण्याचा, दुःख जाणून घेण्याचा, तिचे खरे रूप जाणून घेण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्या अर्चना काटे यांनी केला. 

ही महिला कधी कपड्यावर कपडे चढवून, तर कधी अगदीच नग्नावस्थेत फिरत होती. तथाकथित संवेदनशील समाज मात्र हे चित्र रोज उघड्या डोळ्यांनी पाहत होता. मात्र, काटे यांनी तिला काही दिवस चहा व जेवण देऊन जवळीक साधली. तिचे अंतर्मन जाणून घेतले. तिला या अवस्थेतून बाहेर काढण्याचा विचार त्यांची मैत्रीण विद्या काशीद यांना बोलून दाखविला. 

त्या दोघींनी तिला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. तळेगाव पोलिसांकडे रीतसर अर्ज केला. पोलिस आले अन्‌ ‘ती’ गाडीत बसत नसल्याची सबब सांगून निघून गेले. पोलिस निरीक्षकांच्या सल्ल्यानुसार जनरल हॉस्पिटलला नेले. त्यांनी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, उशीर झाल्याने ते शक्‍य नव्हते. त्यामुळे तिला संजय चव्हाण, सुरेश शिंदे, अर्चना जोगळेकर आदींच्या मदतीने दुसऱ्या दिवशी येरवडा रुग्णालयात दाखल केले. तिथेही नियमावर बोट ठेवून तिला दाखल करून घेण्यास नकार मिळाला. त्यामुळे पुन्हा तिला तळेगावला आणले. 

तळेगाव पोलिसांनी वारीच्या बंदोबस्ताचे कारण सांगून चार दिवस घालविले. अखेर २८ जूनला दुपारी महिला पोलिसांच्या साह्याने हातावरील जखमेवर ससूनमध्ये उपचार केले. प्रमाणपत्रासह न्यायालयाची परवानगी घेऊन महिलेस मनोरुग्णालयात दाखल केले.

समाजसेवेच्या नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्षात मदत करताना येणाऱ्या अडचणींची जाणीव झाली. महिला म्हणून एका दुर्लक्षित महिलेला सुरक्षित ठिकाणी पोचवल्याचे समाधान नक्कीच मोठे आहे.
- अर्चना काटे, सामाजिक कार्यकर्त्या

वटपौर्णिमेची पूजा आणि स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा सोडून अर्चना काटे एका मनोरुग्ण महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी झटत होत्या. रुग्णालये तसेच सरकारी यंत्रणांना नव्या नियमांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.
- विद्या काशीद, सामाजिक कार्यकर्त्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com