मुंबई... धुळे, गोंदिया... आवाज तनिष्कांचा, स्त्रीप्रतिष्ठेचा !

राजूर - तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी आलेल्या महिला.
राजूर - तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी आलेल्या महिला.

पुणे - राजधानी मुंबई... गोंदिया... धुळे... पुणे.. सातारा.. नगर.. बीड... राज्याच्या चतुःसीमांत आज पुन्हा एकदा तनिष्कांचा, स्त्रीप्रतिष्ठेचा आवाज जोमदार घुमला. तनिष्का व्यासपीठाच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका सुमारे 50 केंद्रांवर झाल्या. धावपळीच्या दिनक्रमात तनिष्कांना मतदान करण्यासाठी मुंबईकर महिलांनी आवर्जून वेळ काढला. ग्रामीण भागातही थंडीला न जुमानता, शेतकामाला सुरवात करण्याआधी सकाळी आठ वाजल्यापासून महिलांनी तनिष्कांना मत देऊन त्यांचा आत्मविश्‍वास वाढवला. कर्जत (जि. नगर)मध्ये 25 हजारांपेक्षा जास्त मिस्ड कॉल देऊन सोशल मीडियावर आमचा वावर असतो, हे ग्रामीण भागातील महिला मतदारांनी दाखवून दिले.

तनिष्का व्यासपीठाच्या ऑक्‍टोबरमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुका उत्साहात झाल्या. नंतर गेल्या आठवड्यात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकाही तेवढ्याच उस्फूर्तपणे झाल्या. आता तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होताना तनिष्का उमेदवार आणि मतदारांचा प्रतिसाद थक्क करणारा आहे.

निवडणुकीच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर असाच डिसेंबरपर्यंत होईल. दरम्यान, तनिष्का उमेदवारांच्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मुलाखती घेणार आहेत. त्यातून विविध समित्यांत त्यांची निवड होणार आहे. या अभिनव निवडप्रक्रियेविषयी तनिष्कांना उत्सुकता आहे. म्हणूनच सांताक्रूझ, पार्ले, बांद्य्रापासून भोर, ओझर्ड्यापर्यंत एकसारखाच उत्साह आहे, तो समाजबदलाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा ! दादर ते भाईंदर या मुंबईच्या पश्‍चिम पट्ट्यातील 19 केंद्रांवर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सातारा जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्यांची धांदल सुरू असूनही आज कोंडव्यापासून साताररोडपर्यंत आणि आनेवाडीपासून वाई तालुक्‍यातील ओझर्ड्यापर्यंत सर्वत्र महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर केला. भांगलणीच्या पातीवरून उठून अनेक महिलांनी मतदानात भाग घेतला. कोरेगाव तालुक्‍यात मुळीकवाडी, भाडळे, सातारारोड येथे ग्रामपंचायत निवडणुकीसारखा उत्साह होता. अनेक उमेदवार महिलांनी प्रथम मतपेट्यांचे विधिवत पूजन केले. उसाची व कांदा लागवडीची कामे सुरू असतानाही महिलांचा मतदानात उत्साह दिसत होता. पुणे जिल्ह्यातील भोर, नसरापूर येथे प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी महिलांची रांग लागली होती. अंध महिलांनीही मतदान केले. या निवडणुकीमुळे प्रथमच मतदान पद्धतीची माहिती मिळाली, असे अनेक महाविद्यालयीन तरुणींनी सांगितले.

नसरापूरमधील आदिवासी महिलांनी देखील मतदानात भाग घेतला. मतदान केंद्राबाहेर आकर्षक रांगोळीने, तसेच प्रत्येक महिलेचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात येत होते. असाच उत्साह नगर जिल्ह्यात होता. कर्जत, भांबोरे, अकोले, राजूर, तिसगाव, चिचोंडी पाटील येथे सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

गोंदिया, धुळ्यातही तनिष्का उमेदवार निवडीविषयी उत्सुकता होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com