राज्यभरातील ‘तनिष्कां’चा उत्साहात प्रचार

राज्यभरातील ‘तनिष्कां’चा उत्साहात प्रचार

पुणे - राज्याच्या स्वच्छतादूत संगीता आव्हाळे यांनी वाशीम जिल्ह्यातून तनिष्का निवडणुकीतील आपला सहभाग नोंदवताना किमान ५० गावांत तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून वैयक्तिक स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे. राज्यभरातील तनिष्कांनी आजपासून वेगवेगळ्या पद्धतीने उत्साहात प्रचाराला सुरवात केली आहे.  

संगीता आव्हाळे या तनिष्का व्यासपीठाच्या सक्रिय सदस्या आहेत. त्यांनी केकतउमरा या गावात एका महिन्यात शंभर स्वच्छतागृह उभारली होती. हागणदारीमुक्त गावांचा जणू त्यांना ध्यासच लागला. राज्य सरकारने त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची स्वच्छता मोहिमेचे ॲम्बॅसिडर म्हणून निवड केली. आव्हाळे आता सामाजिक कामाचा परिघ वाढवण्याच्या उद्देशाने प्रचार करीत आहेत. औरंगाबाद, पुणे, नाशिक, जळगाव, सांगली, सातारा, बीड, अकोला, नागपूर, वाशीम आदी ठिकाणच्या तनिष्का सदस्यांनी नवरात्रीचे औचित्य साधून विविध देवींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याबरोबरच प्रचारावर भर दिला. 

श्रीगोंद्यातील उमेदवार सारिका मोहरे यांना आज सुखद अनुभव आला. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना ठाण्यात बोलवून शुभेच्छा दिल्या.

आतापर्यंतच्या त्यांच्या कामाची दखल घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महिला आमदार, विविध पक्षाच्या महिला पदाधिकारी तनिष्का उमेदवारांना प्रचार कसा करावा इथपासून वेळेचे नियोजन कसे कराल, याच्या टिप्सपण देत आहेत. नवरात्रीच्या काळातील तनिष्कांचा निवडणुकीचा प्रचार म्हणजे जणू स्त्रियांच्या अपेक्षांचा जागरच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या पुण्यातील महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे यांनी व्यक्त केली. 

‘सकाळ’च्या विविध आवृत्तींच्या कार्यालयात आयोजित केलेल्या संवादात सध्या विविध समाजघटक, महिला संघटना, शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका, डॉक्‍टर संघटना, लायन्स, रोटरी क्‍लब, पक्षांच्या महिला आघाड्या तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीविषयी उत्सुकता व्यक्त करीत आहेत. मतदानाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचे बारकावे माहीत करून घेत आहेत. या निवडणुकीत दोन पद्धतीने मतदान होणार आहे. पुणे शहरात २४ ते २५ मतदान केंद्रे आहेत. बहुतेक ठिकाणी तिरंगी, दुरंगी आणि काही ठिकाणी चौरंगी लढत होईल. उमेदवार ज्या भागातून निवडणूक लढवत आहेत, तेथील १८ वर्षे पूर्ण झालेली महिला त्यांना मत देऊ शकते. तनिष्का सदस्यांखेरीज समाजातील सर्व महिलांना त्यासाठी उमेदवार सध्या मतदानाचे आवाहन करीत आहेत. असेच चित्र राज्यातील सुमारे ३२५ केंद्रांवर (मोठी शहरे, गावे) आहे. 

मिस्ड कॉलद्वारेही मतदान
महिलांचे प्रत्यक्ष मतदान आणि मिस्ड कॉलद्वारेही उमेदवार भरपूर मते मिळवू शकतात. प्रत्येक तनिष्का उमेदवाराला निवडणुकीपुरता एक मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहे. तनिष्का प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांना फिरण्याच्या, प्रचाराच्या मर्यादा जाणवू नयेत, म्हणून मिस्ड कॉलची खास सुविधा आहे. निवडणुकीचे ते वैशिष्ट्य आहे. एखाद्या महिला मतदाराला इच्छा असूनही, कामामुळे, नोकरी अन्य व्यापामुळे प्रत्यक्ष जाऊन मत देता येत नसेल, तर ती उमेदवाराने प्रचाराच्यावेळी सांगितलेल्या फोन क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकते. मतदानाच्या दिवशी सकाळी आठ ते दोन या वेळेतच संबंधित उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकावर या पद्धतीने हजारो मिस्ड कॉल येऊ शकतात. प्रत्येक मतदान केंद्रावरील उमेदवाराला प्रत्यक्ष मिळालेली मते आणि मिस्ड कॉलद्वारे मिळालेली मते एकत्रित मोजली जातील. जास्त मते मिळविणारी तनिष्का प्रथम क्रमांकाची उमेदवार ठरेल, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या तनिष्का उमेदवारांनाही विविध समित्यांत नेतृत्वाच्या संधी असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com