टाटा मोटर्स कामगारांचे आंदोलन मागे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

वेतनवाढी कराराचा प्रश्‍न 15 दिवसांत सोडविण्याचे आश्‍वासन
पिंपरी - अठरा महिन्यांपासून रखडलेल्या वेतनकरारावर येत्या पंधरा दिवसांत तोडगा काढण्यात येईल. तथापि, उपोषण मागे घ्यावे, या टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत टाटा मोटर्सच्या कामगारांनी सोमवारी (ता. 20) आंदोलन मागे घेतले.

वेतनवाढी कराराचा प्रश्‍न 15 दिवसांत सोडविण्याचे आश्‍वासन
पिंपरी - अठरा महिन्यांपासून रखडलेल्या वेतनकरारावर येत्या पंधरा दिवसांत तोडगा काढण्यात येईल. तथापि, उपोषण मागे घ्यावे, या टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत टाटा मोटर्सच्या कामगारांनी सोमवारी (ता. 20) आंदोलन मागे घेतले.

वेतनवाढ करारावरून कंपनी व्यवस्थापन व टाटा मोटर्स कामगार संघटनेमध्ये वाद निर्माण झाल्याने सप्टेंबर 2015 पासून करार रखडला होता. त्यामुळे संतप्त कामगारांनी स्वयंस्फूर्तीने कंपनीतील नाश्‍ता आणि जेवणावर बहिष्कार घातला होता. दरम्यान, टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री पायउतार झाल्यानंतर रतन टाटा यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली होती. या भेटीमध्ये टाटा यांनी नवीन अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर वेतनवाढ करारावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर कामगारांनी हा बहिष्कार मागे घेतला होता; परंतु गेल्या चार दिवसांपासून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

संघटनेला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करत रतन टाटा यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्यासह आज टाटा मोटर्स कंपनीला भेट दिली. या भेटीत त्यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी वेतन कराराबाबत संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले. मागील तीन वर्षांपासून लोप पावत असलेली टाटा संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी, व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये विश्‍वासाचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर कामगारांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे मला दु:ख होत आहे, अशी भावना टाटा यांनी बोलून दाखविली. त्याचबरोबर करारावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आवाहन चंद्रशेखरन यांना केले. यापुढे देखील टाटा संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जाईल. वेतनवाढ कराराचा प्रश्‍नही पंधरा दिवसांत सोडवला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर कामगारांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन चंद्रशेखरन यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपोषण मागे घेतल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष समीर धुमाळ, महासचिव सुरेश जासूद आणि कार्याध्यक्ष संजय काळे यांनी केली. या वेळी संघटनेचे माजी अध्यक्ष विष्णू नेवाळे उपस्थित होते.

'टाटा समूहाच्या इतिहासात रतन टाटा यांनी कामगारांना कधीही नाराज केलेले नाही. तसेच, दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्याकडे त्यांचा कायम कटाक्ष राहिला आहे. त्याप्रमाणे, वेतनवाढ कराराबाबत दिलेले आश्‍वासनही ते पूर्ण करतील''
- समीर धुमाळ, विष्णू नेवाळे, संघटनेचे आजी, माजी अध्यक्ष

Web Title: tata motors worker agitation return