#GyanGanesh आधी तीन विद्यार्थ्यांना शिकवत होतो ; आता सहा हजार आहेत ! 

#GyanGanesh आधी तीन विद्यार्थ्यांना शिकवत होतो ; आता सहा हजार आहेत ! 

पुणे : "पाच हजार रुपये घेऊन पुण्यात आलो होतो... इथे राहण्यापासून नोकरीपर्यंतचा प्रश्‍न होता; पण "व्यवसाय करायचा' असंच ठरवलं होतं. मेहनतीला फळ आलं आणि गेल्या आठ वर्षांत चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविता आलं...' शिकविण्यासाठी वाहून घेतलेल्या 37 वर्षीय नवनीत मानधनी यांची ही कथा! 

वाणिज्य शाखेची पदवी घेऊन नांदेडहून पुण्यात आलेल्या मानधनी यांना पदव्युत्तर पदवी घ्यायची होती. त्यासाठी दहा हजार रुपये खर्च येणार होता अन्‌ जवळ तर फक्त पाच हजार रुपयांची शिदोरी; मग लिपिक म्हणून नोकरी करावी लागली. सकाळी सात ते साडेदहा कॉलेज, अकरा ते पाच नोकरी. त्यानंतर पुन्हा रात्री नऊ ते बारादरम्यान एसटीडी बूथमध्ये नोकरी.

दोन ठिकाणी नोकरी करून दोन हजार रुपये मिळाले. एमकॉमची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर एका शिकवणी वर्गात तासिका पद्धतीवर त्यांना नोकरी मिळाली. तेथे होते अवघे तीन विद्यार्थी. वेगवेगळ्या शिकवणी वर्गांत तासिका पद्धतीने काम केल्यावर धनकवडीमध्ये एका शिकवणी वर्गात नोकरी मिळाली अन्‌ पुढे तोच शिकवणी वर्ग चालविण्यासाठी घेतला. त्यानंतर स्वतःचे शिकवणी वर्ग सुरू केले अन्‌ आता सहा हजार विद्यार्थी शिकत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांची पीएचडीही पूर्ण झाली. 

""वाणिज्य शाखेच्या शिकवणी वर्गांचे शुल्क माफकच असले पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे तपशील पालकांपर्यंत पोचले पाहिजेत,' अशी खूणगाठ मनाशी बांधली होती. परीक्षेचे गुण पालकांना कळविण्यासाठी व्हॉट्‌सऍप ग्रुपचा वापर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आली; त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यात झाली,' असे मानधनी सांगत होते. 

शिकविण्याच्या पारंपरिक पद्धतींना मानधनी यांनी आधुनिक तंत्राची जोड दिली. महत्त्वाच्या अभ्यासक्रमांवरील माहितीपूर्ण क्‍लिप "यू-ट्यूब'वरही प्रसिद्ध केल्या जातात. त्याचाही अनेक विद्यार्थ्यांना फायदा होतो. आता वाणिज्य शाखेशी संबंधित सर्व अभ्यासक्रमांसाठी शहरात एक सुसज्ज महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहितीही मानधनी यांनी दिली. 

आता मानधनी यांनी हॉटेल व्यवसायातही पाऊल टाकले आहे. दोन मित्रांच्या साथीने इंडोनेशियातील बालीमध्ये "बॉलिवूड मसाला' हे रेस्टॉरंट ते सुरू करत आहेत. 

सामाजिक भानही! 

पुण्याच्या चारही दिशांना या शिकवणी वर्गाच्या शाखा आहेत. वाणिज्य शाखेशी संबंधित सर्वच अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन त्यातून मिळते. गरजू विद्यार्थ्यांना आणि पोलिसांच्या मुलांना गरज असल्यास या शिकवणी वर्गात मोफत प्रवेश आहे. काम करता करता शिक्षण घेणाऱ्यांसाठी दर रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच असा वर्गही माफक शुल्कासह घेतला जातो. 

यातून आपण काय शिकणार? 

- मेहनतीची तयारी असेल, तर "शून्य' असतानाही कुठल्याही कामाची सुरवात करता येते. 
- "समाजातील काही जणांना आपल्या मदतीची गरज आहे', हे कायम लक्षात ठेवायला हवं 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com