किमान तापमानाचा फेब्रुवारीत उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच 14.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
पुणे - शहरात गेल्या दहा वर्षांच्या फेब्रुवारीमधील किमान तापमानाचा उच्चांक यंदा नोंदला गेला. आतापर्यंत 11.3 असलेले सर्वाधिक किमान तापमान आता 14.4 अंश सेल्सिअस अशा नवीन उच्चांकी तापमानाची नोंद हवामान खात्यात झाली आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच 14.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
पुणे - शहरात गेल्या दहा वर्षांच्या फेब्रुवारीमधील किमान तापमानाचा उच्चांक यंदा नोंदला गेला. आतापर्यंत 11.3 असलेले सर्वाधिक किमान तापमान आता 14.4 अंश सेल्सिअस अशा नवीन उच्चांकी तापमानाची नोंद हवामान खात्यात झाली आहे.

पुण्यात फेब्रुवारीमध्ये सरासरी किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतके असते. गेल्या दहा वर्षांमध्ये म्हणजे 14 फेब्रुवारी 2007 ला 11.3 अंश सेल्सिअस इतक्‍या फेब्रुवारीतील उच्चांकी किमान तापमानाची नोंद झाली होती. यंदा यात सुमारे तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन 14.4 अंश सेल्सिअस तापमान गेल्या आठवड्यात नोंदले गेले, असे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे.

शहर आणि परिसरात होळीपर्यंत थंडी असते. दिवसा उन्हाचा चटका वाढला असला, तरीही रात्रीच्या तापमानात मोठी वाढ झालेली नसते. त्यामुळे किमान तापमान हे सरासरीपेक्षा काही अंश सेल्सिअसने कमी किंवा जास्त झाल्याचे आत्तापर्यंत अनुभवले जात होते. गेल्या दहा वर्षांमध्ये 2007 आणि 2010 या दोन वर्षांमध्येच किमान तापमानाच्या पाऱ्याने दहा अंश सेल्सिअस ओलांडले आहे. यंदा मात्र 14 पर्यंत किमान तापमानाचा पारा वाढलेला दिसतो, अशी माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

दिवसा आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढलेला आहे; तसेच त्यामुळे किमान तापमानाचा पाराही वाढलेला दिसतो. गेल्या आठवड्यात काही दिवस आकाश अंशतः ढगाळ होते. त्याचा परिणामही किमान तापमानाचा पारा वाढण्यात झाल्याची शक्‍यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फेब्रुवारीतील किमान तापमान (तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
वर्ष ................. किमान तापमान

2016 ............. 8.7
2015 ............. 9.8
2014 ............. 8.1
2013 ............. 9.1
2012 ............. 4.6
2011 ............. 9.8
2010 ............. 10.4
2009 ............. 9.4
2008 ............. 6.4
2007 ............. 11.3

Web Title: temperature increase in february