बंडू आंदेकरसह टोळीतील दहा जण वर्षभरासाठी तडीपार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - सराईत गुन्हेगार टोळीतील सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर यांच्यासह दहा जणांना शहरातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे यांनी सोमवारी याबाबत आदेश जारी केला. बंडू आंदेकर यांनी गेल्या महापालिका आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती.

पोलिस उपायुक्‍त डहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीप्रमुख बंडू आंदेकर (वय 62, रा. नाना पेठ); तसेच टोळीतील सदस्य सागर अर्जुन शिंदे (वय 35, रा. कुंभारवाडा, नाना पेठ), प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय 26, नाना पेठ), दानिश मुशीर शेख (वय 24, रा. खुर्शिद कॉम्प्लेक्‍स, नाना पेठ), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय 21, रा. नाना पेठ), अक्षय दशरथ अकोलकर (वय 23, रा. नाना पेठ), कुणाल सोमनाथ रावळ (वय 25, रा. नाना पेठ), तुषार बाळू भगत (वय 24, रा. नाना पेठ), राहुल सुरेश खेत्रे (वय 37, रा. राजेवाडी) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. या टोळीतील सराईत गुन्हेगारांविरुद्ध 1985 पासून गुन्हे दाखल आहेत. 

त्यांच्याविरुद्ध फरासखाना, खडक, समर्थ आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, गंभीर दुखापत करणे, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, पळवून नेणे, अग्निशस्त्रे बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण केली होती. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 नुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्‍त डहाणे यांनी दिली.