चाकणमधील थरार... असाही एक दिवस येतो....

There is a day like thunderstorm in Chakan...
There is a day like thunderstorm in Chakan...

पुणे : नेहमी सारखाच कालचा सोमवार सुरु झाला. गुन्ह्यांच्या बातम्या देण्यात व्यस्त होतो. तेवढ्यात चाकण येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती कानावर आली. चाकण आपल्या हद्दीत येत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वरिष्ठांकडून अचानक चाकणला जाण्याचे आदेश आले. मी आणि फोटोग्राफर संतोष हांडे पावणेचार वाजता तळवडे मार्गे चाकणकडे निघालो. तळवडे ओलांडल्यानंतर चाकण एमआयडीसीच्या हद्दीत आलो असता महेंद्रा कंपनीपासून वाहनांची रांग लागल्याचे दिसून आले. वाहन कोंडीतून पुढे जाणे शक्य नसल्याने पुन्हा माघारी फिरून डिव्हायडरच्या पलीकडल्या बाजूला जावून नो एंट्रीतून म्हाळुंगे चौक गाठला. त्यावेळी चौकात शंभर तरुण हातात दगड, दांडकी घेऊन उभे होते. त्यांनी रस्त्यात टायर जाळण्याची तयारी केली होती. आम्हाला येताना पाहून त्यांनी आमच्या दिशेने दगड उगारून आम्हाला थांबण्यास भाग पाडले. 

आम्ही थांबल्यानंतर सकाळचे प्रतिनिधी असल्याचे त्यांना सांगितले. मग त्यांनी आमचा फोटो काढा असे म्हणत टायर पेटवून फोटो करण्यास भाग पडले. त्यानंतर आतल्या मार्गाने गल्लीतून नाणेकरवाडी जवळ पुणे नाशिक हायवेला आलो. तिथे एक जमाव हिंसक झाल्याचे पाहायला मिळाले. आम्ही जमाव बाबत माहिती घेत असतानाच, आताच शुटींग घेणाऱ्या एका महिला पत्रकाराची गाडी पलटी केल्याचे एकाने सांगितले. ती मोटार आम्हाला दिसत होती. आमच्या जवळ दीड लाखाचा कॅमेरा होता. त्याचीही सुरक्षितता महत्त्वाची असल्याने जवळच असलेल्या गवते कुटुंबीयांच्या घरी आम्ही कॅमेरा ठेवला. दुचाकीही तिथेच लावली. त्यानंतर पायी पुन्हा महामार्गावर आलो तोपर्यंत जमावाने पलटी केलेल्या मोटारीला आग लावून दिली होती. जमाव हिंसक होत होता. त्याला आवरण्यासाठी एकही पोलीस दिसत नव्हता. त्यांनी काही नागरिकांनाही मारहाण केल्याचे दिसून आले. जमावाने पेटवलेल्या मोटारीचा आम्हाला फोटो घ्यायचा होता. मोबाइलवरूनही फोटो घेणे शक्य नव्हते. कारण जमावाने जवळपास शंभरहून अधिक नागरिकांचे मोबाइल फोडले होते. यामुळे फोटो कसा घ्यायचा या विचारात आम्ही होतो.

पेटत्या मोटारीचा फोटो घेण्यासाठी जवळच असलेल्या एका हॉस्पिटलचा आसरा घेतला. हॉस्पिटलच्या जिन्यामध्ये जाऊन खिडकीतून पेटलेल्या मोटारीचे फोटो काढले. त्यानंतर आम्ही पुन्हा पुणे नाशिक महामार्गावर आलो. तेथून वाहने चाकणकडे जात असल्याचे दिसून आल्याने दुचाकी व कॅमेरा सोबत घेतला. कॅमेरा एका कापडी पिशवीत टाकून घेतल्याने तो कोणाच्याही नजरेस पडत नव्हता. दुचाकीवरून तळेगाव चौकाकडे निघालो. वाटेत जमावाने जाळलेल्या तीन बसेस रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. या बसचा देखील फोटो घ्यायचा असल्याने आम्ही पुन्हा एकदा रस्त्यालगतच्या एका रहिवासी इमारतीचा सहारा घेतला. एका कुटुंबाला विनंती करून त्यांच्या गॅलरीतून जळालेल्या तीन बसचे फोटो काढले. त्यानंतर पुन्हा तळेगाव चौकाच्या दिशेने निघालो. काही अंतरावर जमावाने पुन्हा चार ट्रकला आग लावल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे जवान आग विझविण्यासाठी आले. तसेच पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी आल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली. त्यापैकी एका ट्रकमध्ये रसायनाचा साठा होता. केबिनला लागलेली आग केमिकलच्या पिंपाजवळ येऊन पोहोचली होती.  अग्निशामक दलाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे आणि त्यांच्या सहकार्याने जीव धोक्यात घालून ही आग विझवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. तळेगाव चौकात आल्यावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचे दिसून आले. रस्त्याच्या कडेला पुणे नाशिक महामार्गावर चौकाच्या दोन्ही दिशेने जवळपास वीस बसेस जाळल्याचे दिसून आले. यापैकी काही बसेसची आग धुमसत होती.

पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणचा हिंसक जमाव पांगला होता. तसेच क्रेनच्या साहाय्याने रस्त्यात जाळण्यात आलेल्या बसचे सांगाडे बाजूला काढण्याचे काम सुरू होते. पोलिसांची कुमक असल्याने आता बिनधास्तपणे कॅमेरा बाहेर काढून या घटनेचे चित्रीकरण करत होतो. तळेगाव चौकाकडून राजगुरूनगरच्या दिशेने निघालो असता याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीएमपीएमएल, एसटी आणि खासगी बसची जाळपोळ केल्याचे दिसून आले.

दरम्यानच्या काळात आम्ही आमच्या वरिष्ठांच्या संपर्कात होतो. एकवेळ बातमी आणि फोटो नाही मिळाले तरी चालतील परंतु तुमचा जीव धोक्यात घालू नका, असे त्यांच्याकडून वारंवार सांगितले जात होते. त्यांच्या सूचनेनुसार काळजी घेत आम्ही फोटो काढत होतो. त्यानंतर आम्ही आमचा मोर्चा चाकण बस स्थानकाकडे वळविला. या ठिकाणीही एक सुमो जीप पलटी करून जाळण्यात आली होती. तसेच एसटीही जाळण्यात आली होती. या एसटीची धग अद्याप कायम होती. एसटी स्टँडवर हताशपणे बसलेल्या महिला वाहक आणि एसटी चालक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील दंगलीचे भीषण अनुभव सांगितले. तसेच बसस्टॉपवर थांबलेल्या प्रवाशांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तोपर्यंत सायंकाळचे साडेसात वाजले होते. लवकर बातमी आणि फोटो द्यायचे  असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुन्हा कार्यालयाकडे प्रयाण केले. पत्रकारितेतील हा वेगळा अनुभव बराचं काही शिकवून गेला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com