तीस गावांमधील सातबारा नोंदी दुरुस्तीला वेग

तीस गावांमधील सातबारा नोंदी दुरुस्तीला वेग

पिंपरी - सातबारा नोंदीतील दुरुस्तीसाठी सरकारने एक ऑगस्टपूर्वीची मुदत दिली आहे. त्यामुळे चिंचवड व भोसरी मंडल कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ३० गावांच्या हद्दीतील दुरुस्तीला वेग आला आहे. सध्या या ठिकाणी नऊ गावांच्या दुरुस्ती बाकी असून, एक ऑगस्टपूर्वी ते पूर्ण होणार आहे. 

हवेली तालुक्‍यातील सातबारा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या ठिकाणी सातबारा ऑनलाइन मिळत नाही. उतारे मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागते. सातबारावर आतापर्यंत तीन वेळा दुरुस्त्या झाल्या असल्या तरी काही गावांची पहिलीच दुरुस्ती सुरू आहे. आता होणारी तिसरी दुरुस्ती कायमची असून, यानंतर नागरिकांना ऑनलाइन सातबारा डाउनलोड करता येणार आहे; तसेच त्यात होणारे अपडेटही ऑनलाइनच होणार असल्याची माहिती तलाठ्यांनी दिली. चिंचवड, पिंपळे गुरव, रहाटणी, पिंपरी वाघेरे, रावेत, भोसरी, दिघी, चऱ्होली, चिखली आदी गावांतील बातबारा दुरुस्ती सुरू आहे. 

अशी चालते प्रक्रिया 
ऑनलाइन सातबारा उताराऱ्यांच्या प्रिंट काढल्या जातात. त्यानंतर मूळ सातबारा पुस्तकात पाहून प्रिंटवर झालेल्या चुकांची नोंद होत आहे. त्यानंतर या प्रिंट पुणे येथील प्रांत कार्यालयात जमा करून त्यावरून ऑनलाइन सातबारावर अपडेशन होत आहे. 

चिंचवड मंडल कार्यालयाअंतर्गत गावे १५ व खातेदार ५६,७९७ आहेत. त्यात चिंचवड - १०५३६, आकुर्डी - ३५६७, निगडी - ३०००, पिंपळे गुरव - ११४००, रहाटणी - १३५००, पिंपरी वाघेरे - ५५६६, रावेत - ५८०, मामुर्डी - ४३२, पिंपळे सौदागर - २८३६, चिंचोली - ८००, किनई - ७००, विठ्ठलनगर - ८३५, किवळे - ११४३, देहू - ११४०, माळीनगर - ७६२ खातेदारांचा समावेश आहे. 

भोसरी कार्यालयाअंतर्गत एकूण गावे १५ व खातेदार ५५,०२९ आहेत. त्यात भोसरी - ९७००, दापोडी - १२३९, पिंपळे निलख - २३८७, सांगवी - ७५०, चिखली - ११५४७, तळवडे - ४५०४, मोशी - ४६८३, बोऱ्हाडेवाडी - ४००२, डुडुळगाव - १०४०, चऱ्होली - २७५९, वडमुखवाडी - २३५४, चोविसावाडी - २८०७, निरगुडी - १६५, दिघी - ५८१५ बोपखेल - १२७७ खातेदारांचा समावेश आहे.

सातबारा दुरुस्तीचे काम वेगात सुरू असून, नागरिकांची इतर कार्यालयीन कामे सांभाळत हे काम सुरू आहेत. तलाठी व त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या मार्फत दुरुस्ती काम सुरू आहे. नागरिकांना अद्ययावत सातबारा ऑनलाइन पाहावयास मिळणार आहे. 
- गीतांजली शिर्के, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com