सरकारी कर्मचारी वसाहतींना नवी झळाळी 

दिलीप कु-हाडे
शुक्रवार, 25 मे 2018

भिंतीचे प्लास्टर निघालेले, घरात जुन्या शहाबादी फरशा, गळके छप्पर, शौचालय व स्नानगृहाचे तुटलेले दरवाजे, घरांना रंगाचा अभाव, स्वयंपाकघरातील ओट्यांची दुरवस्था अशा घरांमध्ये कर्मचारी राहत आहेत.

येरवडा - शास्त्रीनगर येथील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पन्नास ते साठ वर्षांपूर्वीच्या वसाहतींसह भिमा शंकर वसाहत, विविध बंगल्यामधील कर्मचाऱ्यांच्या वसाहतींच्या दुरूस्तीसाठी तीन कोटी रूपयांची तरतूद झाली आहे. त्यामुळे या वसाहतींना नवी झळाळी मिळणार असल्याची माहिती शाखा अभियंता तुळशीराम थिटे यांनी दिली. 

थिटे म्हणाले, ‘‘येरवड्यातील शास्त्रीनगर व भिमा शंकर येथील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहती पन्नास ते साठ वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यामुळे येथील घरांची मोठी दुरवस्था झाली आहे. भिंतीचे प्लास्टर निघालेले, घरात जुन्या शहाबादी फरशा, गळके छप्पर, शौचालय व स्नानगृहाचे तुटलेले दरवाजे, घरांना रंगाचा अभाव, स्वयंपाकघरातील ओट्यांची दुरवस्था अशा घरांमध्ये कर्मचारी राहत आहेत. राज्य सरकारच्या अंदाजपत्रकात सरकारी निवासस्थाने दुरूस्तीसाठी एक रूपयाचा देखील तरतूद नसल्यामुळे कित्येक वर्षे या वसाहतींची दुरवस्था झालेली होती.’’

येरवडा परिसरातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतींंची दुरूस्ती करण्याला प्राधान्यक्रम देण्यात आले होते. त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना वसाहतीच्या दुरूस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात सांगितले होते. शास्त्रीनगर येथील चाळीत शंभर निवासस्थाने, तर अडीचशे सदनिकांची दुरूस्ती होणार आहे. यासह भिमाशंकर येथील शंभर आणि बंगला क्रमांक पाच मधील नव्वद सदनिकांची दुरूस्ती होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना घरांमध्ये चांगल्या सोई-सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे दहा वर्ष सरकारी कर्मचारी वसाहतींमधील रहिवाशांच्या तक्रारी येणार नाहीत. 

राज्य सरकारने विशेष दुरूस्ती अंतर्गत पावणेतीन कोटी रुपयांची मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये शास्त्रीनगर येथील इमारती व चाळीतील घरातील भिंतींना प्लास्टर, जुनी शहाबादी फरशी बदलून नवीन स्टाईल्स फरश्‍या बनविण्यात येणार आहेत. शौचालय व स्नानगृहाचे नुतनिकरण, नविन दरवाजे, स्वयंपाकगृहातील ओटा, संपूर्ण घराला रंगरंगोटी करण्यात येणार आहे. - तुळशीराम थिटे, शाखा अभियंता, येरवडा 

राज्य सरकारच्या इमारतींना दरवर्षी अंदाजपत्रकात तरतूद असते. मात्र कर्मचाऱ्यांच्या वसाहतींच्या बावीस-साेळा या शिर्षकाखाली तरतूदच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वर्षांनुवर्ष वसाहतींची दुरुस्तीच झालेली नव्हती. निधी मंजूर झाल्यामुळे आता चांगल्या सोई-सुविधा मिळतील अशी आशा वाटते. - विलास धेंडे, निवासी, शास्त्रीनगर वसाहत 

Web Title: Three crore rupees have been made for government employees colonies