तीन आजी व तीन माजी नगरसेवक रिंगणात 

सुशांत सांगवे 
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

पुणे - तीन विद्यमान नगरसेवकांबरोबरच तीन माजी नगरसेवकांनी निवडणुकीच्या रिंगणात घेतलेली उडी... भाजपच्या मानसी देशपांडे आणि मनसेच्या अस्मिता शिंदे या दोन विद्यमान नगरसेविकांची एकमेकांविरोधात लढत... भाजपचे सुनील कांबळे आणि राजेंद्र शिळीमकर या विद्यमान नगरसेवकांच्या विरोधात सुनील बिबवे आणि शैलेंद्र नलावडे या माजी नगरसेवकांनी थोपटलेले दंड... अशा वातावरणामुळे "मार्केट यार्ड-लोअर इंदिरानगर'मधील निवडणुकीत रंगत वाढली आहे. 

आकाराने मोठा असलेला आणि सुमारे 80 हजार लोकसंख्या असलेला प्रभाग म्हणून "मार्केट यार्ड-लोअर इंदिरानगर'कडे पाहिले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दोन, तर कॉंग्रेसकडून एकच उमेदवार उभा आहे. मात्र भाजप, शिवसेना आणि मनसेकडून प्रत्येकी चार उमेदवार उभे आहेत. त्यात भाजपच्या विद्यमान तीन नगरसेवकांचा तर मनसेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचे या प्रभागाकडे विशेष लक्ष आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रभागात नुकतीच भेट दिली होती. असे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला मत देणारे पारंपरिक मतदारही या भागात बरेच आहेत. त्यामुळे लढत रंगतदार बनली आहे. 

या प्रभागात प्रेमनगर, आंबेडकरनगर, आनंदनगर, इंदिरानगर, भीमवसाहत, पापळ वस्ती, बिबवेवाडी ओटा हा वस्ती परिसर याशिवाय हमालनगर, गंगाधाम, आई माता मंदिर परिसर, बिबवेवाडी गाव, ईएसआय कॉलनी, झाला कॉम्प्लेक्‍स, योगायोग सोसायटी, लोअर इंदिरानगर, शंकर महाराज मठ परिसर, शाहू सोसायटी लेन हा भाग येतो. त्यामुळे 60 टक्के सोसायट्या आणि 40 टक्के वस्ती, असा भाग आहे. देशपांडे यांचा पूर्ण तर शिळीमकर आणि कांबळे यांचा बहुतांश भाग या प्रभागात आहे. शिंदे यांच्याही जुन्या प्रभागातील बहुतांश भाग येथे आला आहे. व्यापारी, बहुभाषिक मतदार येथे मोठ्या प्रमाणात राहतो. 

"अ'मध्ये भाजपच्या अनसूया चव्हाण, शिवसेनेच्या प्रीती रोकडे आणि मनसेच्या सुवर्णा खरात यांच्यात तर "ब'मध्ये कॉंग्रेसचे शैलेंद्र नलावडे, भाजपचे राजेंद्र शिळीमकर, शिवसेनेचे अमोल रासकर, मनसेचे अभिजित टेंबेकर यांच्यात लढत होणार आहे. "क'मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैशाली शिंगवी, भाजपच्या मानसी देशपांडे, शिवसेनेच्या धनकौर दुधानी आणि मनसेच्या अस्मिता शिंदे यांच्यात तर "ड'मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील बिबवे, भाजपचे सुनील कांबळे, शिवसेनेचे शशिकांत पापळ आणि मनसेचे चंद्रकांत अमराळे हे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यांच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे.

Web Title: Three former & Three existing corporator in election