मळवलीजवळ मोटारीच्या धडकेने तिघे जखमी

lonavala-accident
lonavala-accident

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मळवलीजवळ मोटारीच्या धडकेने दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघे जखमी झाले. महिला मोटारचालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला.

पोलिस हवालदार कैलास रामचंद्र कदम (वय 45, रा. वडगाव मावळ), पोलिस नाईक शिवानंद हनुमंत मोसलगी (वय 30, रा. मोडनिंब, सोलापूर) यांच्यासह अंधेरी मुंबई येथील भुमापन अधिकारी चंद्रकांत शिंदे हे या अपघातात जखमी झाले. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास द्रुतगती मार्गावर नियम मोडणाऱ्या वाहनांवर मळवलीजवळ कारवाई करीत होते. त्या वेळी महिला चालक रेखा शहा (रा. पिंपरी, पुणे) यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. मोटारीने पोलिस कर्मचारी कैलास कदम व शिवानंद मोसलगी यांना धडक दिली. तसेच मोटार दुभाजक तोडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दुसऱ्या मोटारीवर जोरात आदळली. त्यात मोटारीतील नगर भुमापन अधिकारी चंद्रकांत शिंदे हे यात जखमी झाले. कैलास कदम हे वडगाव मावळ महामार्ग टॅप तर शिवानंद मोसलगी हे मोडनिंब टॅपचे कर्मचारी आहेत. कदम व शिंदे यांच्या पायांना दुखापत झाली असून, मोसलगी यांच्या डोक्‍याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मोटारचालक रेखा शहा यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जीव धोक्‍यात घालून कारवाई
द्रुतगती मार्गावरील वाढते अपघात व सातत्याने होणारी वाहतूक कोंडी या पार्श्‍वभूमीवर महामार्गाचे महानिरीक्षक पद्मनाभन यांनी द्रुतगती मार्गावर नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. लेनकटिंग, अतिवेग, अवजड वाहनांवर महामार्ग पोलिसांच्या वतीने रायगड, ठाणे, पुणे या तिन्ही विभागांमध्ये कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या वतीने आतापर्यंत हजारो वाहनांवर कारवाई करीत लाखोंचा दंड वसूल केला आहे. मात्र, कारवाई दरम्यान महामार्ग पोलिसांना मर्यादा येत असून, पोलिस कर्मचारी जीव धोक्‍यात घालून वाहनांवर कारवाई करीत असल्याचे चित्र आहे. टोलनाक्‍यांसह बोरघाटात द्रुतगतीवर कारवाई सुरू आहे. कारवाईसाठी प्रसंगी कर्मचारी महामार्गच्या मध्यभागी उभे राहत वाहन अडविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काही वेळी वाहनचालकांना वेग नियंत्रित न झाल्यास एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव जाण्याचा धोका असल्याची व्यथा एका पोलिस कर्मचाऱ्याने व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com