तीन वाद्य, तीन शैली अन्‌ एक राग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - तिघांचेही वेगवेगळे घराणे. वेगवेगळे गुरू. ज्यावर हुकूमत मिळवली असे वाद्यही वेगवेगळे... असे तीन शैलींचे तीन कलाकार एकत्र आले. संतूर, बासरी अन्‌ साइड गिटार या तीन वाद्यांवर एकच राग सादर करून त्यांनी संगीतातील त्रिधारेचे दर्शन घडवले. 

पुणे - तिघांचेही वेगवेगळे घराणे. वेगवेगळे गुरू. ज्यावर हुकूमत मिळवली असे वाद्यही वेगवेगळे... असे तीन शैलींचे तीन कलाकार एकत्र आले. संतूर, बासरी अन्‌ साइड गिटार या तीन वाद्यांवर एकच राग सादर करून त्यांनी संगीतातील त्रिधारेचे दर्शन घडवले. 

धनंजय दैठणकर (संतूर), सुनील अवचट (बासरी), मनीष पिंगळे (स्लाइड गिटार) हे ते तीन कलाकार. संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. विश्‍वमोहन भट यांचे हे शिष्य. उस्ताद मेहबूब खॉं मिरजकर स्मृतिप्रित्यर्थ "तालविश्‍व'च्या "स्वर त्रिनाद' या संगीत मैफलीत ते एकत्र आले होते. दमदार वादनातून रागेश्री राग खुलवत त्यांनी श्रोत्यांना स्वरांच्या दुनियेत तल्लीन केले. आलाप, जोडबरोबर आपापल्या वाद्यांवरचे प्रभुत्वही दाखवून दिले. त्यांना नवाज मिरजकर, केतन बिडवे (तबला) साथ करत होते. 

पुण्यात कलाकाराला एकदा दाद मिळाली, की त्याला जगभर दाद मिळते, असे वडील आणि गुरू अनिंदो चटर्जी यांनी मला सांगितले. त्यामुळे मनात धाकधूक आहे, असे सांगत अनुब्रत चॅटर्जी यांनी तबलावादन सादर केले. त्या वेळी अनिंदो चटर्जी यांनी घडविलेला तबलावादनातला खरा "शागीर्द' श्रोत्यांना अनुभवायला मिळाला. त्याआधी संस्थेतील विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनीही तबलावादन सादर केले. या सर्वांचा सतारवादक उस्ताद उस्मान खॉं यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. 

मी सतराव्या वर्षी पुण्यात आलो. त्या वेळी इथे उस्ताद मेहबूब खॉं मिरजकर हे तबल्यातले मोठे घराणे होते. त्यांनी अनेक शिष्यांना घडवले. या घराण्याची परंपरा अशीच पुढे वाढत राहावी. माझ्या सतारवादनाला मिरजकर यांची एकदा साथ मिळाली होती. ती साथ म्हणजे मला त्यांचा आशीर्वादच वाटतो. 
- उस्ताद उस्मान खॉं, सतारवादक 

टॅग्स