खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

पुणे - पूर्वी झालेले भांडण आणि आर्थिक कारणावरून एकाचा खून करून जनता वसाहत येथे कालव्याजवळ टाकून देणाऱ्या तीन जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी जन्मठेप सुनावली. दंडाच्या रकमेपैकी चाळीस हजार रुपये मयताच्या आईला द्यावेत, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले. 

पुणे - पूर्वी झालेले भांडण आणि आर्थिक कारणावरून एकाचा खून करून जनता वसाहत येथे कालव्याजवळ टाकून देणाऱ्या तीन जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी जन्मठेप सुनावली. दंडाच्या रकमेपैकी चाळीस हजार रुपये मयताच्या आईला द्यावेत, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले. 

रवींद्र नामदेव वाडेकर (वय 27, रा. शिनोली, ता. आंबेगाव), गुलाब इब्राहिम शेख (वय 52, रा. दांडेकर पूल), अल्लाबक्ष बाबामिंया मुंडे (वय 40, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सागर ऊर्फ पप्पू आर्वीकर (वय 25, रा. घोडगाव, ता. आंबेगाव) याचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी कुलकर्णी यांनी बारा जणांची साक्ष नोंदविली. त्यांना न्यायालयीन कामात पोलिस हवालदार एस. आर. मेरुकर यांनी साहाय्य केले. सरकार पक्षाने सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा आणि त्याला पूरक साक्ष न्यायालयाने ग्राह्य मानली. या गुन्ह्याचा तपास अधिकारी संपत पवार आणि आरोपी आणि मयत यांना एकत्रित पाहणाऱ्या महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. 

मयत सागर हा जीपचालक होता. घोडेगाव येथे तो जीप चालविण्याचा व्यवसाय करीत होता. आरोपी आणि मयत यांच्यात आर्थिक कारणावरून वाद झाले होते. यावादातून आरोपींनी सागरला 9 जुलै 2012 रोजी रात्री जीपमध्ये जबरदस्तीने बसवून पुण्यात आणून मारहाण केली. त्याचा मृतदेह जनता वसाहत येथे कालव्याजवळ टाकून दिला होता. 

बेवारस अवस्थेत आढळेल्या या मृतदेहाविषयी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनंतर त्याची ओळख पटली. मयत हा घोडेगाव येथील असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी नातेवाईक आणि इतरांकडे चौकशी केल्यानंतर आरोपींविषयी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.