तीन वर्षे पाणीकपातीचे संकट

तीन वर्षे पाणीकपातीचे संकट

पाच वर्षांत एक लाख मिळकतींमध्ये वाढ; पाण्याचा पुरवठा मात्र तेवढाच पिंपरी - पाटबंधारे विभागाशी झालेल्या करारानुसार यापुढे पवना धरणातून जादाचे पाणी उचलता येणार नाही. गेल्या चार वर्षांपासून शहरात एक लाख सहा हजार ३९५ मिळकतींमध्ये वाढ झाली आहे. मात्र पाण्याचा पुरवठा वाढलेला नाही. आंद्रा किंवा भामा आसखेड धरणातून शहराला पाणी मिळण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे आणखी तीन वर्षे शहरावर पाणीकपातीचे संकट राहणार आहे.

शासनाच्या पाटबंधारे विभागाशी पिंपरी चिंचवड महापालिकेने करार केला आहे. या करारानुसार ४१३ दशलक्ष लिटर पाणी पवना धरणातून उचलण्यास संमती दिली आहे. तसेच त्यापेक्षा जादा पाण्याचा उपसा केल्यास पाटबंधारे विभागाकडून दंड आकारण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका दंड भरून पाणी घेत आहे. मात्र ४६५ दशलक्ष लिटरपेक्षा जादा पाणी उचलण्यास पिंपरी चिंचवड महापालिकेला परवानगी नाही. यामुळे गेल्या चार वर्षांपासून पाणीपुरवठा विभाग ४६५ दशलक्ष लिटर पाणी घेते. जर थेट जलवाहिनीद्वारे पवना धरणातून पाणी घेतल्यास त्यामध्ये वाढ करता येणार आहे, असेही या करारामध्ये नमूद करण्यात आले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख इतकी होती. सध्या २० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. याशिवाय शहरात कामासाठी बाहेरून येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहराला आंद्रा धरणातून १०० दशलक्ष लिटर व भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर झाला आहे. मात्र हे पाणी शहराला मिळण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या काळात शहरातील आणखी किमान ७५ हजार मिळकतींची वाढ होण्याची शक्‍यता आहे. यामुळे भविष्य काळात शहरात आणखी पाणीकपातीची शक्‍यता आहे.

पवना धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यास मावळमधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यामुळे थेट जलवाहिनीचे काम अद्यापही बंद आहे. अशाच प्रकारे भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाणार आहे. जर शेतकऱ्यांनी थेट जलवाहिनीला विरोध केला नाही तरच हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. तर शेतकऱ्यांनी विरोध केला तर हा प्रकल्प आणखी लांबणीवर पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणल्यानंतर ते चिखली येथील गायरानाच्या जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. गायरानाची ही जागा महापालिकेला मिळावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. 

आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणून त्यावर चिखली येथील गायरानाच्या जमिनीवरील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाणार आहे. या जागेची महापालिकेने शासनाकडे मागणी केली आहे. मात्र या जागेवर चिंचवड देवस्थान ट्रस्टने दावा सांगितला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

पवना धरणातून सध्या ४६५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. पाटबंधारे विभागाशी केलेल्या करारानुसार त्यापेक्षा जादा पाण्याचा उपसा करता येणार नाही. आगामी तीन वर्षांत भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी उपलब्ध होणार असल्याने त्यानंतर शहराला मुबलक पाणी उपलब्ध होईल.
- रवींद्र दुधेकर, सहशहर अभियंता-पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com