नक्षलग्रस्त भागांत ‘तीन मुलांचे चार दिवस’!

नक्षलग्रस्त भागांत ‘तीन मुलांचे चार दिवस’!

पुणे - आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे हे तीन महाविद्यालयीन युवक. गेल्या वर्षीच्या (२०१५) डिसेंबरमध्ये या तिघांनी मिळून आपापल्या पुरता ‘भारताचा आणि भारतातल्या माणसांचा’ शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हे तिघं इतरांपेक्षा खूप वेगळे ठरले आहेत. एरवी जिथे जाण्याची सहज म्हणून कुणीही हिंमत करणार नाही, अशा नक्षलग्रस्त बस्तरच्या प्रदेशात हे तिन्ही दोस्त भ्रमंतीसाठी गेले, अन्‌ तेही चक्क सायकलवर !... त्यांनी त्यांचा हा प्रवास पुस्तक रूपाने उलगडला आहे. 

युवक दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रंगलेल्या एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात हा अनुभव उपस्थितांना घेता आला. निमित्त होते आदर्श, विकास आणि श्रीकृष्ण यांनी ‘भारत सफरीचा’ विलक्षण अनुभव ज्यात शब्दबद्ध केलाय, अशा ‘तीन मुलांचे चार दिवस’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे !

रंगकर्मी अतुल पेठे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, डॉ. मनोहर जाधव, लेखक मिलिंद बोकील, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ आदींच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. विद्यापीठाचा मराठी विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ आणि साधना प्रकाशन यांनी तो आयोजिला होता. उपस्थितांनी या तिन्ही ‘थ्री इडियट्‌स’चं भरभरून अभिनंदन करत त्यांच्या धाडसाची आणि जिज्ञासू वृत्तीची प्रशंसाही केली.

पेठे म्हणाले, ‘‘हे केवळ पुस्तक नसून, ती एक वास्तववादी प्रवासाची रसरशीत कहाणी आहे. आयुष्याच्या समोरचे प्रश्न सोडवू पाहणाऱ्या आणि ‘कोहं’च्या शोधात असणाऱ्या युवकांचं हे जिवंत अनुभवचित्रण आहे.

नक्षलग्रस्त भाग काय असतो? तिथले प्रश्न काय? आदिवासींचा आणि माझा काय बरं संबंध आहे?... असे प्रश्न या मुलांनी त्यांच्या पातळीवर उलगडू पहिले आहेत.’’

गाडे म्हणाले, ‘‘टुरिझम’चा भारत खरा, की गावागावांत असणारा भारत खरा, या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधायला हवंय.’’

आदिवासींची स्थिती वाईट
मिलिंद बोकील म्हणाले, ‘‘आपल्याच आदिवासी समाजाची आपण अतिशय वाईट स्थिती करून ठेवली आहे. आदिवासींच्या विकासासाठी आवश्‍यक अशा आदिवासी सल्लागार परिषदेच्या बैठका कधी सुरळीत होणार, हा आजही प्रश्नच आहे. घटनेत तरतूद असूनही आदिवासींच्या न्याय 
हक्कासाठी काहीही न करणे हे आपल्या व्यवस्थेचे दुर्दैव आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com