भाऊबिजेची ओवाळणी म्हणून शौचालये बांधा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

मंचर - हागणदारीमुक्त गाव योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई व अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी पेठ (ता. आंबेगाव) येथे शौचालये नसलेल्या घरांना अचानकपणे भेट देऊन दिवाळीनिमित्त भाऊबिजेची ओवाळणी म्हणून शौचालयाचे बांधकाम करा, असे साकडे घातले. शौचालयाचे महत्त्व व गरज पटवून दिली. अनाहूतपणे घरासमोर आलेल्या पाहुण्यांच्या भेटीमुळे कुटुंबातील लोक गोंधळून गेले. येत्या आठ दिवसांत शौचालय बांधण्याचे आश्‍वासन नागरिकांनी दिले.

देसाई यांच्यासमवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, डॉ. अतुल चिखले, एस. बी. अंतूरकर, विक्रम काळे, लता केंगले, संचेती अभंग, सरपंच सुरेखा पडवळ, उपसरपंच संतोष धुमाळ, ग्रामसेवक रमेश बुसूम, अनिल टेमकर होते. पेठ गावात अजून 239 कुटुंबांकडे शौचालये नाहीत. जनजागृती व्हावी. या उद्देशाने देसाई यांनी थेट कुटुंब मालकांची भेट घेतली.
चार एकर जमीन व दोन लाख रुपयांची गाडी खरेदी केलेली कुटुंबे बारा हजार रुपये खर्चाचे शौचालय का बांधत नाहीत. महिला ही घरातील लक्ष्मी असते. तिला उघड्यावर शौचासाठी का पाठविता, असा प्रश्‍न देसाई यांनी केला. त्या वेळी कुटुंबातील लोक निरुत्तर झाले. काही जणांनी शौचालयासाठी साहित्य आणून ठेवले होते; पण जागेच्या समस्येमुळे शौचालय बांधता येत नसल्याची खंत काही कुटुंब प्रमुखांनी व्यक्त केली. चर्चा करून जागेचे वाद जागेवरच देसाई यांनी मिटविले. त्यानंतर शौचालय बांधू, अशी ग्वाही देण्यात आली.

'उघड्यावर घाण करणे गुन्हा'
पुणे जिल्ह्यात एकूण 59 हजार कुटुंबांकडे शौचालये नाहीत. 31 डिसेंबरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करायचा आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना नोटिसा देण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावरून सुरू आहे. संबंधितांना खाते उतारे, रेशनिंग, कर्जपुरवठा व वीजपुरवठा बंद होईल. उघड्यावर घाण करणे गुन्हा आहे. संबंधितांना गुड मॉर्निंग पथकाद्वारे पकडून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून एक हजार 200 रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल, असे नोटिशीमध्ये नमूद केल्याचे दौलत देसाई यांनी सांगितले.

Web Title: Toilet construction as a Bhaubij gift