गाडीतळ चौकाने मोकळा श्वास घेण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर

संदीप जगदाळे
शनिवार, 14 एप्रिल 2018

बसथांबा स्थलांतरीत केल्याने व वाहतूक सिग्नल सुरू झाल्याने प्रवाशी व वाहन चालकांचा थोडा गोंधळ उडत आहे. त्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने व वाहतूक विभागाचे कर्मचारी नियुक्त केले असून ते प्रवाशी व वाहन चालकांना मार्गदर्शन करत आहेत. लोकांना नवीन बदल लक्षात आल्यानंतर येथील वाहतूक समस्या व नागरिकांचा गोंधळ कमी होईल असा दावा प्रशासनाने केला आहे. 

हडपसर : दिवसरात्र शेकडो वाहनांच्या गराड्यात सापडणाऱ्या गाडीतळ चौकाने मोकळा श्वास घ्यावा यासाठी पोलिस आणि पीएमपीएल प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्यांना काही प्रमाणात यशही येऊ लागले आहे. या चौकातील वाहतूक प्रश्नाविषयी सकाळमधून वृत्त प्रसिध्द केल्यानंतर प्रशासनाने हे पाउल उचलले आहे.

या चौकातील बंद स्थितीतील सर्व वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करण्यात आले आहेत. तसेच प्रदीप ट्रेडर्स येथील बस थांबा कृष्णछाया हॅाटेल शेजारी स्थलांतरीत केला आहे. त्यामुळे गाडीतळ चौकाने मोकळा श्र्वास घेतला आहे. पूलाखालील रिक्षा स्टॅंड व हातगाडीवाले यांचे अतिक्रमण तातडीने काढण्यात येणार आहे. वाहतूक विभागा, महापालिका व पीएमपीएल प्रशासनाने या चौकाची पाहणी करून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे.

बसथांबा स्थलांतरीत केल्याने व वाहतूक सिग्नल सुरू झाल्याने प्रवाशी व वाहन चालकांचा थोडा गोंधळ उडत आहे. त्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने व वाहतूक विभागाचे कर्मचारी नियुक्त केले असून ते प्रवाशी व वाहन चालकांना मार्गदर्शन करत आहेत. लोकांना नवीन बदल लक्षात आल्यानंतर येथील वाहतूक समस्या व नागरिकांचा गोंधळ कमी होईल असा दावा प्रशासनाने केला आहे. 

नागरिक संजय गाढवे म्हणाले, या चौकातून दररोज लाखोंच्या संख्येने वाहने धावत आहेत. वाहनसंख्या वाढतच असून, त्यामुळे वाहतुकीची समस्या अधिकच जटील झाली आहे. त्यामुळेच शहरातील वाहतूक कोंडीवर उत्तर शोधण्यासाठी पोलिसांचा वाहतूक विभाग, पीएमपीएल प्रशासन व महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जे. डी. कळसकर म्हणाले, चौकात वाहतूक सिग्नल लागल्याने वाहतुकीची होणारी कोंडी कमी होऊन ती सुरळीत झाली आहे. गाडीतळ बस थांब्यातून येजा करणा-या प्रवाशांना होणारा त्रास कमी झाला आहे. लवकरच बीआरटीतून पोलिस स्टेशनकडे जाणा-या वाहनांसाठी एक सिग्नल बसविण्यात येईल. 

पीएमपीएलचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड म्हणाले, नागरिकांच्या सूचना लक्षात घेतल्या जातील. स्थलांतरीत बस थांब्यावर निवारा करण्यात येईल. तसेच अतिक्रमण हटविण्याबाबत संबधित विभाग कारवाई करेल. गाडीतळ येथून पुढे स्थलांतरीत केलेल्या बसेस पुढील प्रमाणे आहेत. मनापा भवन ( १११), शिवाजीनगर ( १८०), चिंचवड ( २०४), १३९ (निगडी), १८७ ( घोरपडी-पुणे स्टेशन), २०३ (पुणे स्टेशन), २०१ ( आळंदी), २०७ ( सासवड-स्वारगेट).

Web Title: traffic in Hadapsar