वाहतूक नियम मोडणाऱ्यांना धडा शिकवा

pcmc-traffic
pcmc-traffic

वाहतूक पोलिस चौकात अडवणूक करतात, म्हणून आपण पावलापावलावर त्यांच्या नावाने बोटे मोडतो. पण दुसऱ्या बाजूने वाहनचालकसुद्धा किती बेशिस्त, मस्तावले आणि मुजोर आहेत, त्याकडेही पाहिले पाहिजे. आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून ५० लाखांवर वाहने आहेत. त्यापैकी नियम पाळणारे आणि मोडणाऱ्यांची संख्या आता रेकॉर्डवर आहे. सिग्नल न पाळणाऱ्यांची संख्या वाढते आहे, तशी विरोधी दिशेने (नो एन्ट्री) जाणाऱ्यांचे धाडस वाढले आहे. नो पार्किंगमध्ये वाहने लावणारे आजकाल पोलिसांना जुमानेसे झालेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा महाभागांमुळे वारंवार अपघात होतात, वाहतूक कोंडी होते. 

या मंडळींना शिस्त लावण्यासाठी दोन्ही शहरांत मिळून १२५० सीसी कॅमेरे विविध चौकांत बसविले. गेल्या दीड-दोन वर्षांपासून हा वॉच सुरू आहे. प्रारंभी वाटले आतातरी बेशिस्त चालक ताळ्यावर येतील. मनुष्यबळ कमी असलेल्या वाहतूक पोलिसांचे काम हलके होईल. दुर्दैव असे की, सगळे मुसळ केरात गेले. सीसी कॅमेऱ्यांनी सिग्नल तोडणाऱ्यांच्या वाहनांचे नंबर रेकॉर्ड केले. वाहतूक पोलिसांनीही त्यानुसार चालकांच्या राहत्या घरी नोटीस पाठवली. गेल्या चार महिन्यांतील त्याबाबतचे काही रेकॉर्ड हातात पडले. तेव्हा कायदा न पाळणाऱ्यांची संख्या किती वाढली आहे ते लक्षात आले. नियम मोडणाऱ्या एकूण एक लाख ६७ हजार ६१९ चालकांना वाहतूक पोलिसांनी नोटीस बजावली. त्यातील ७० टक्‍क्‍यांच्यावर चालक निगरगट्ट निघाले. 

कायद्याला घाबरून दंड भरणारे फक्त १९ हजार ९२४ चालक आहेत. त्यांनी रीतसर दंड भरला. मात्र, तब्बल एक लाख ४७ हजार ६९५ चालकांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली, पोलिसांनाही चुना लावला. ही वाहतूक पोलिसांची आणि कायद्याचीही थट्टा आहे. कायदा, नियम पाळणाऱ्यांची ही वाढती संख्या चिंताजनक आहे. शहरात पादचाऱ्यांपेक्षा अतिक्रमण करणाऱ्यांचीच मस्ती जास्त वाढली आहे. महापालिकेचा मिळकतकर, राज्य आणि केंद्र सरकारचे कर भरणाऱ्या सज्जनांपेक्षा करचोरी करणाऱ्यांचीच संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही चांगली लक्षणे नाहीत. 

कायद्याचा धाक राहिलेला नाही. उलट अशांनाच अलीकडे पद आणि प्रतिष्ठाही मिळते. खरे तर, कुठलाही कायदा पायदळी तुडविणाऱ्यांना वेगळे पाडले पाहिजे. मग तो साधा वाहतुकीचा नियम मोडणारा का असेना. अन्यथा या शहरात मोगलाई माजेल. प्रश्‍न फक्त बेशिस्त वाहतुकीचा नाही, तर अशा वाढत्या प्रवृत्तीचा आहे.

दंड वसुली कमी, मांडवलीच अधिक 
राज्यातील एकाही शहरात नाहीत असे सहा, आठ पदरी प्रशस्त, सुंदर रस्ते पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. आजवर झालेले पूल, उड्डाण आणि होऊ घातलेले नवीन बीआरटी रस्ते, मेट्रो प्रकल्प पाहता कुठेही नियम मोडण्याची वेळ कदापी येणार नाही. अशाही परिस्थितीत सिग्नल मोडणे, झेब्रा पट्यावर उभे राहणारे आहेत. रिक्षातून तीन ऐवजी चार-पाच प्रवासी भरून वाहतूक पोलिसांसमोरून जाणारेही सर्रास दिसतात. 

वाहतूक पोलिस आणि सीसी कॅमेऱ्यांचीही भीती नसल्याने आता चौघे-चौघे बसून जातात. काळ्या काचा लावलेल्या मोटारींची संख्या महापालिकेत दिसते, पण त्यांच्यावर कारवाईची हिंमत पोलिसांमध्ये नाही. चित्र विचित्र नंबर प्लेटला कायद्यात बंदी असताना ‘भाई’,‘भाऊ’,‘दादा‘,‘काका’ अशा नंबर प्लेट्‌स सर्वत्र दिसतात. 

नो पार्किंगमधील वाहने उचलून दंड वसुलीपेक्षा मांडवलीच अधिक चालते. एकटे निर्जीव सीसी कॅमेरे प्रामाणिकपणे ड्यूटी बजावतात.  मात्र, वाहनचालक आणि वाहतूक पोलिस एकमेकांशी गद्दारी  करतात. सर्वांनी स्वतःशी आणि कायद्याशी प्रामाणिक राहिले  पाहिजे. 


आज दोन्ही शहरांत मिळून फक्त १२५० सीसी कॅमेरे आहेत. कायद्यात सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण शहरातील प्रत्येक चौक, रस्ता, गल्लीबोळ सीसी कॅमेऱ्याखाली 
आला पाहिजे. स्मार्ट सिटीला ते आवश्‍यक आहे. नोटिसा पाठवून  दंड न भरणाऱ्यांना दोनदा संधी  देऊन तिसऱ्यांदा वाहन परवाना अथवा वाहन जप्ती सारखी कठोर कारवाईची तरतूद कायद्यात  गरजेची आहे. शहराच्या आणि सर्वांच्या भल्यासाठी हे व्हावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com