हातगाड्या, बेशिस्त पार्किंगमुळे कोंडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

पिंपरी - रस्त्यावर भाजी मंडई भरत असल्याने १६ नंबर चौक कायमच गुदमरलेला. भाजी विक्रीसाठी थेट रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या हातगाड्या, भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी, ग्राहकांकडूनही रस्त्यावरच केले जाणारे बेशिस्त पार्किंग आणि त्यातून होणारी वाहतूक कोंडी, ही येथील मुख्य समस्या. दररोज सायंकाळी होणाऱ्या या अतिक्रमणांमुळे वाहतूक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडतो. पिंपरी-चिंचवड महापालिकेची उदासीनता आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष यामध्ये सर्वसामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे. या बेशिस्तपणाला आळा घालावा, अशी येथील नागरिकांची आग्रही मागणी आहे. 

दिवसभर बऱ्यापैकी शांत असणारा हा रस्ता सायंकाळी पाचनंतर अतिक्रमणांमुळे गजबजू लागतो. अल्पावधीत रस्त्याला भाजी मंडईचे स्वरूप येते. भाज्यांबरोबरच खाद्यपदार्थ आणि विविध प्रकारचे साहित्य अशा एकूण ५० ते ६० हातगाड्या येथे अस्तावस्त स्वरूपात लावल्या जातात. तर त्याच्या मधील भागात पथारीवाले अतिक्रमण करतात. त्यानंतर ग्राहकांचा ओघ वाढू लागतो. तर कार्यालये सुटल्यानंतर घरी परतणारे नोकरदारही रस्त्यात वाहने थांबवून भाजी खरेदी करताना पाहायला मिळतात. त्याव्यतिरिक्त काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती, डांगे चौक परिसरातील ग्राहकही या ठिकाणी भाजी खरेदीसाठी येतात. त्यांच्या वाहनांचीही गर्दीत भर पडते. अस्ताव्यस्त स्वरूपात लावल्या जाणाऱ्या या वाहनांमुळे संपूर्ण रस्ता जाम होतो. त्यामुळे वाहतुकीसाठी पाच फुटाहूनही कमी रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहतो. परिणामी कार्यालये व शाळा- महाविद्यालये सुटण्याच्या कालावधीत रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण पडतो. अत्यंत अरुंद मार्गातून वाहने दामटताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. तर पादचाऱ्यांना जीव धोक्‍यात घालून वाट काढावी लागते. रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी आणि हातगाड्यांच्या सापळ्यात अडकणाऱ्या पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍कील होते. 

केवळ डांगे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरच नाही, तर काळेवाडी फाट्याच्या दिशेकडील मार्गालादेखील अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. भाजी विक्रेते, फळविक्रेते, खाद्य पदार्थांच्या हतगाड्यांकडून हे अतिक्रमण केले जाते. त्यामुळे या मार्गावरदेखील रहदारीस अडथळा निर्माण होतो.

दररोज सायंकाळी पाच वाजता या कावेरीनगर परिसराला अतिक्रमणांचा विळखा पडतो. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक समस्येत वाढ होत आहे. त्याला आवर घालणे गरजेचे आहे.
- प्रदीप शिर्के

सायंकाळी या रस्त्यावरून ये-जा करताना भीती वाटते. येथील वाहतुकीमध्ये तासन्‌ तास अडकायला होते. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
- भास्कर गोसावी