वाहतूक कोंडीकडे अक्षम्य दुर्लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पिंपरी - रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांचा विळखा, मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृतपणे पार्किंगमुळे पिंपरी कॅम्पसह मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पादचाऱ्यांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. 

पिंपरी - रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांचा विळखा, मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृतपणे पार्किंगमुळे पिंपरी कॅम्पसह मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पादचाऱ्यांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. 

साई चौक ते शगुन चौक व गुरुद्वारा रस्ता तसेच मुख्य बाजारपेठ, रिव्हर रोड, काळेवाडी रस्ता दरम्यान वाहतूक कोंडीची ही समस्या भेडसावत आहे. मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फुटवेअर, कपडे, फर्निचर, खाद्य पदार्थ आदींची येथे दुकाने आहेत. बहुतेक व्यापाऱ्यांनी वाढीव बांधकामे, अतिक्रमणे करून त्यांचे जाहिरात फलक आणि माल थेट पदपथांवर मांडलेला असतो, त्यामुळे परिसरात पदपथच शिल्लक नाहीत. गुरुवारी व रविवारी बाजारपेठ, भाजी मंडईत गर्दी असते. त्या वेळी दिवसभर वाहतूक कोंडीचा अनुभव येतो. रिव्हर रस्त्याने एकेरी वाहतूक असताना अनेक जण नियम डावलून वाहने दामटतात, त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात, तसेच रेल्वे स्टेशन, गुरुद्वारा, डीलक्‍स रस्त्यावर खाद्य पदार्थांच्या दुकानाबाहेर मोठ्या संख्येने वाहने थांबविलेली असतात. या भागातील अतिक्रमणांना राजकीय पाठबळ असल्याने महापालिका व पोलिस प्रशासन कारवाई करत नाही. दुसरीकडे महापालिकेचे संबंधित विभाग जबाबदारी झटकत आहेत. 

या भागातात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू आहे, अनेकांचे साहित्यही जप्त केले आहे. व्यावसायिकांनी वाढीव व पदपथावरील बांधकामांवर कारवाई करण्याचे काम बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे आहे. 
सीताराम बहुरे, प्रशासन अधिकारी, "ड' प्रभाग. 

पदपथ व वाढीव बांधकामावर कारवाई करणे हे संबंधित क्षेत्रीय अधिकारी, प्रशासन अधिकारी यांचे काम आहे. आम्ही सरकारी व खासगी जागेवर केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करतो. 

रामदास टकले, उपअभियंता, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, मनपा. 
 

संपूर्ण परिसराची पाहणी करून वाहतूक कोंडीवर कायमचा पर्याय कसा केला जाईल, याबाबत अभ्यास केला जाणार आहे, तसेच ज्या ठिकाणी कारवाई गरज भासेल, त्या ठिकाणी कडक कारवाई करून नागरिकांची गैरसोय दूर करणार आहे. 
रवींद्र निंबाळकर, पोलिस निरीक्षक, पिंपरी वाहतूक शाखा.