आम्हीही शिस्त पाळतो, म्हटलं...

बेलबाग चौक -‘वाहतूक जनजागृती दिना’निमित्त गुरुवारी वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करणाऱ्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या विद्यार्थिनी.
बेलबाग चौक -‘वाहतूक जनजागृती दिना’निमित्त गुरुवारी वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करणाऱ्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या विद्यार्थिनी.

पुणे - कुठलीही सुटी नसताना गुरुवारचा दिवस म्हणजे गजबजलेला असणार... शहरातले रस्ते आणि विशेषतः चौक हे प्रचंड वर्दळीने भरलेले असणार, हे सांगायला नकोच; पण ६ ऑक्‍टोबरचा गुरुवार मात्र या ठोकताळ्याला अपवाद ठरला. कधी नव्हे ते एखाद्या सामाईक अन्‌ सार्वत्रिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यारस्त्यांवर पुणेकर उतरले. त्यांनी ‘आम्हीही शिस्त पाळतो’ हे प्रत्यक्षात दाखवून देत आपलाच बेशिस्तीचा इतिहास जणू स्वच्छ धुऊन काढण्यासाठीचे पाऊल टाकले... ‘वाहतूक जनजागृती दिना’ने हा बदल शक्‍य करून दाखवला...

रस्त्यावर उतरलेल्या दीड लाखाहूनही अधिक नागरिकांनी तब्बल शंभर किलोमीटर अंतराची मानवी साखळी तयार केली. ‘आम्ही पुणेकर शहराची वाहतूक सुधारणार आणि देशात आदर्श घडविणार...!’ हे अनेक पुणेकरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारी (ता. ६) वाहतूक जनजागृती दिन राबविण्यात आला. ‘सकाळ माध्यम समूह’ही या उपक्रमात सक्रिय सहभागी झाला होता. याचा एकत्रित परिणाम म्हणूनच की काय; पण खंडूजी बाबा चौक, बेलबाग चौक, टिळक चौक अन्‌ यांसारखे एरवी सतत वर्दळीने आणि कित्येकदा ‘पळा पळा... कोण पुढे पळे तो’च्या भाऊगर्दीतच हरवलेले अनेक चौक आणि जोडरस्ते आज मोकळे झाले. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठ्या महत्त्वाकांक्षेने राबविलेल्या नागरी उपक्रमाचेच हे फलित होते...

पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील नागरिक, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक-युवती, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, खासगी क्‍लासेसचे विद्यार्थी, सामाजिक तसेच सेवाभावी संघटना, बॅंक कर्मचारी, डॉक्‍टर्स अशा अनेकविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत रस्त्यावर उतरले होते. वाहतुकीच्या नियमांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि वेगवेगळ्या संस्था-संघटनांचे कार्यकर्ते, वाहतूक पोलिस रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना नियम पाळण्याचे आवाहन करीत होते.

महापौर प्रशांत जगताप, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्‌, मनपा आयुक्त कुणाल कुमार, पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, सहआयुक्त सुनील रामानंद, जिल्हाधिकारी सौरभ राव, वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, राष्ट्रीय पुरस्कार विजेती कलाकार गौरी गाडगीळ आदींनी डेक्कन येथील खंडूजीबाबा चौक येथे उपस्थित राहून नागरिकांना ‘शिस्तबद्ध पुणेकर अशी ओळख घडवा, नियम पाळा,’ असे आवाहन केले.

...अन्‌ पुणे स्तब्ध झाले!

पुणेकरांच्या मनात वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती व्हावी, शहराच्या वाढत्या पसाऱ्यात वाहतूक शिस्तीचे अनिवार्य महत्त्व कळावे, या हेतूने पुणे पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘वाहतूक जनजागृती दिना’स पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर मिळालाच. पण, वाहतूक शिस्तीची एकत्रित शपथ घेण्याची अभिनव संधीही पुणेकरांनीही दवडली नाही. सकाळी ठीक अकराच्या ठोक्‍याला पुढच्या दोन मिनिटांसाठी वाहने, पादचारी अन्‌ शब्दशः रस्तेही स्तब्ध झाले; अन्‌ अख्ख्या पुण्याने शिस्तबद्ध वाहतुकीची शपथ घेतली...गुरुवारी झालेल्या या अभिनव उपक्रमातला हा एक महत्त्वाचा टप्पा होता.

जसजसा घड्याळाचा काटा अकराच्या दिशेने कूच करत होता, तसतसे अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे शहरातील मुख्य चौकांमध्ये जमा होताना दिसत होते. प्रत्येक जण आज आपण स्वतःसाठी, आपल्या पुणे शहरासाठी काहीतरी करत आहोत, असे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. बरोब्बर अकरा वाजता खंडुजी बाबा चौकात तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती व्यासपीठावरून शपथ घेण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर लगेच लाखो पुणेकरांनी परस्परांच्या उपस्थितीत आणि परस्परांच्या साक्षीने शहरभान जागवणारी ही शपथ घेतली.

मी शपथ घेतो, की...
पुणे शहराच्या संस्कृतीचा मला अभिमान आहे. येथील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवणे हे माझे कर्तव्यच आहे. वाहतुकीच्या नियमांचे मी पालन करणार आणि इतरांनाही सांगणार. वाहतुकीचे नियम तोडणे धोक्‍याचे आहे, याची मला जाणीव आहे. नियमभंगाचे मी कधीही अनुकरण करणार नाही. पुण्यास शिस्तबद्ध शहर म्हणून नावलौकिक मिळवून देईन. जय हिंद!

निर्धार वाहतूक शिस्तीचा, सुसंस्कृत पुणेकरांचा !
‘निर्धार वाहतूक शिस्तीचा, सुसंस्कृत पुणेकरांचा’ असं ब्रीदवाक्‍य घेत ही मोहीम राबवली गेली. देशभक्तीपर गीतांनी अन्‌ बॅंडच्या तालावर वाहतूक शिस्तीचा जागर केला जात होता. तर, ‘स्काउट’ चे विद्यार्थी लोकांना वाहतूक नियम आणि त्यांची गरज समजावून सांगत होते. झेब्रा क्रॉसिंगवरून पादचारी ‘खरंच’ जाऊ शकतात, हे सुखद दृश्‍यसुद्धा आज पाहायला मिळाले. झेब्रा क्रॉसिंगवर थांबण्याची किमान अपेक्षा करणारे किंवा मग ‘लाल दिवा’ बघून थांबायला हवे, असे आवाहन करणारे फलक असतील, किंवा मग हॉर्नचा वापर शक्‍यतो टाळा असं म्हणणारे पोस्टर्स... पण एरवी प्रत्येकाच्याच मनात असतानाही कृतीत न दिसणाऱ्या या अपेक्षांना आज जनजागृती दिनी निर्धाराने प्रत्यक्ष कृतीत उतरवले गेले. सिग्नलवर उभे राहणाऱ्या दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालकांच्या वाहनांवर वाहतूक पोलिस, शालेय विद्यार्थी, कार्यकर्ते स्टीकर्स लावून जनजागृती करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com