वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर ई- चलानद्वारे कारवाई सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

पुणे - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून ई- चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली जात असून, बुधवारपासून ही कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून नियम मोडणाऱ्या वाहनचालकाला त्याचे छायाचित्र, कोणत्या नियमाचे उल्लंघन केले आणि दंडाच्या रकमेचा संदेश मोबाईलवर पाठविण्यात येत आहे. ई- चलानद्वारे दिवसभरात सरासरी दीड हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील विविध चौकांमध्ये एकूण 1 हजार 236 सीसीटीव्ही असून, त्यापैकी 217 पीटीझेड कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून झेब्रा क्रॉसिंग, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबरप्लेट आणि मोबाईलवर बोलणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन होताच संबंधित वाहनचालकाच्या मोबाईलवर नियम कोठे मोडला त्याचे छायाचित्र, दंडाची रक्‍कम आणि ती भरण्यासाठी लिंक पाठविण्यात येत आहे. 

पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला आणि सहआयुक्‍त सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी स्पार्कन आयटी सोल्यूशन्स कंपनीची मदत घेण्यात येत असल्याचे डॉ. मुंढे यांनी नमूद केले. 

मुंढे म्हणाले... 
- प्रत्यक्ष चौकांमध्ये दंड वसुलीसाठी स्वाइप मशिन्स 
- सध्या दोनशे स्वाइप मशिनचा वापर, महिनाभरात आणखी चारशे मशिन्स 
- सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात दोन शिफ्टमध्ये 32 कर्मचारी कार्यरत 
- दंड भरण्यासाठी वाहतूक विभाग अथवा व्होडाफोन स्टोअरमध्ये सुविधा 
- सात दिवसांत दंड न भरल्यास न्यायालयात प्रकरण पाठविणार 
- कारवाईबाबत माहिती हवी असल्यास लिंक punetrafficop.net