रोहित्र आहे; वीज नाही

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

पुणे - कर्ज काढून आणि कोट्यवधी रुपये खर्च करून गळती रोखण्याबरोबरच ग्राहकांना उत्तम दर्जाचा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कडून इन्फ्रा - २ या योजनेअंतर्गत शहरात वीज रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्यात आले; परंतु त्या रोहित्राला वीजपुरवठाच नसल्याने त्यातून ग्राहकांना वीजपुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचे उघड झाले आहे. 

पुणे शहरातील वीजपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी महावितरणकडून इन्फ्रा-२ ही योजना हाती घेण्यात आली. या योजनेअंतर्गत नवीन वीजवाहिन्या टाकणे, जुन्या वाहिन्या बदलणे, नवीन वीज उपकेंद्र उभारणे, उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, नवीन वीज वितरण रोहित्रे उभारणे इत्यादी कामाचा समावेश होता. त्यानुसार शहराच्या विविध भागात सुमारे अकराशे वीज वितरण रोहित्रे बसविण्यात आली आहेत. प्रत्यक्षात ‘सकाळ’च्या बातमीदाराने जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर ही रोहित्रे बसविण्यात आल्याचे आढळले; परंतु त्यातून वीजपुरवठाच होत नसल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकराशेपैकी सुमारे ३०० रोहित्रे बंद अवस्थेत असल्याचे समजते.

वडगाव-धायरी विभागात अशीच ६३० केव्हीए क्षमतेची रोहित्रे बसविण्यात आली आहेत; परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ती बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रोहित्रे आहेत, परंतु त्यातून ग्राहकांना वीजपुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. ही दोन्ही रोहित्रे बसविण्यासाठी महावितरणने सुमारे ५० लाख रुपये खर्च केला आहे. मात्र तो वाया गेला आहे. तरीही कंत्राटदाराला संपूर्ण कामाचे बिल अदा करण्यात आल्याचेही दिसून आले आहे. त्यापैकी नऱ्हे येथील जेएसपीएम कॉलेजजवळील रोहित्र महिनाभरापूर्वी काढून जमा केल्याचे दिसून आले. मात्र, हे रोहित्र उभारण्यासाठीची पायाभूत यंत्रणा जागेवर तशीच पडून आहे. इन्फ्रा-२ पूर्वी राबविण्यात आलेल्या इन्फ्रा १ मध्येही अशीच कामे झाल्याचे समोर आले आहे. पर्वती विभागांतर्गत २२/११ केव्ही आणि १० एमव्हीए क्षमतेचे वाडिया उपकेंद्र २०१० मध्ये उभारण्यात आले. त्यासाठी अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करूनही हे उपकेंद्र अद्याप सुरू झालेले नाही.

600 ते 700 ग्राहकांना फायदा झाला असता 
एका ६३० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून सुमारे ६०० ते ७०० ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. रोहित्रांमधून ग्राहकांना वीजपुरवठाच होत नसल्याने अस्तित्वात असलेल्या रोहित्रांवर ताण येत आहे. 

महावितरणच्या या घोळाचा सर्वांत मोठा फटका नऱ्हे येथील सर्व्हे नंबर १३ आणि धायरी येथील गणेशनगर परिसरातील नागरिकांना बसत आहे. या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो; तसेच तो सुरळीत होण्यास बराच वेळ लागतो. यासंदर्भात वारंवार महावितरणकडे तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नाही. लाखो रुपये खर्चून ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले; परंतु त्या ट्रान्स्फॉर्मरला आणि त्यातून ग्राहकांना वीजपुरवठा होत नसेल, तर अशा योजनांचा उपयोग काय? 
- स्नेहल पुराणिक, सूरज बनसोडे, विशाल मुळीक (सर्व नऱ्हे येथील रहिवासी) 

इन्फ्रा-२ ही योजना पूर्ण झाली आहे. त्यामध्ये जी कामे अपूर्ण राहिली आहेत, त्यांचा समावेश अन्य योजनांमध्ये करण्यात आला आहे. ज्या ठेकेदारांनी अर्धवट कामे केली आहेत, त्यांची अनामत रक्कम जप्त करून त्यामधून ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. 
- एम. जी. शिंदे, मुख्य अभियंता, पुणे विभाग, महावितरण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com