फक्त महिनाभर थांबा; पुण्याचे चित्र बदलेल : मुंढे

टीम ई सकाळ
गुरुवार, 6 एप्रिल 2017

प्रवाशांना पुढील काही दिवसांमध्येच चांगल्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्याच्या बसेसची अवस्था खूपच वाईट आहे. पैसे देऊनही चांगला प्रवास करता येणार नसेल तर नक्कीच 'पीएमपी' तोट्यात जाईल. परंतु, चांगली सेवा दिली तर प्रवाशीही नक्कीच 'पीएमपी'कडे वळतील. चांगली सुविधा देण्यासाठी 'पीएमपी' 'एसी' बसेसची सुविधा देणार आहे.

- तुकाराम मुंढे, अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, 'पीएमपी'

पुणे : पुणे शहरातील ढासळलेली 'पीएमपी'ची सेवा एक महिन्यात सुधारणार आहे. तोटा दूर करण्याबरोबरच प्रवाशांना चांगल्या सुविधा दिल्या जातील, असे 'पीएमपी'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी आज (गुरुवार) स्पष्ट केले.

'पीएमपी'ची कार्यभार हाती घेतल्यानंतर मुंढे यांनी आज सकाळ कार्यालयाला भेट दिली. ते म्हणाले, पुण्यातील 'पीएमपी' सुधारण्यासाठी एक महिना कालावधी पुरेसा आहे. 'पीएमपी'मधील विविध विभागांचा अभ्यास करत असून, त्या त्रुटी दूर करत आहे.

मुंढे यांच्याशी झालेला वार्तालाप :

'पीएमपी'चे ऍप

'पीएमपी'ची सेवा सुधारण्याबरोबरच काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी व नागरिकांशी 'कनेक्ट' राहण्यासाठी 'पीएमपी ई कनेक्ट' या नावाने ऍप आणणार आहे. या ऍपमुळे बसचे वेळापत्रक, आपल्या मार्गावर येणारी बस नेमकी कोठे आहे. याशिवाय सविस्तर माहिती ऍपच्या माध्यमातून दिली जाणार आहे. यामुळे ऍपचा नागरिकांना व 'पीएमपी'ची व्यवस्था सुधारण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकेल.

'ईटीएम'चा वापर बंधनकारक

देशामधील विविध ट्रान्स्पोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिनचा (ईटीएम) वापर केला जातो. 'पीएमपी'मध्येही ही सुविधा असतानाही काही ठिकाणी पारंपारीक पद्धतीने तिकीट दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वप्रथम ती पद्धत बंद करून 'ईटीएम' बंधनकारक केले जाणार आहे.

...तर एसी बसेस

प्रवाशांना पुढील काही दिवसांमध्येच चांगल्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्याच्या बसेसची अवस्था खूपच वाईट आहे. पैसे देऊनही चांगला प्रवास करता येणार नसेल तर नक्कीच 'पीएमपी' तोट्यात जाईल. परंतु, चांगली सेवा दिली तर प्रवाशीही नक्कीच 'पीएमपी'कडे वळतील. चांगली सुविधा देण्यासाठी 'पीएमपी' 'एसी' बसेसची सुविधा देणार आहे. यामुळे प्रवाशांचाही सुखकारक प्रवास होईल व 'पीएमपी'चेही उत्पन्न वाढेल

'पीएमपी'कडे पुरेसे मनुष्यबळ

'पीएमपी'कडे पुरेसे मनुष्यबळ आहे. परंतु, नियोजनाचा अभाव असल्यामुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळत नाही. काही दिवसांमध्येच हा अभाव दूर केला जाईल.

बसच्या स्वच्छतेकडे लक्ष देणार

'पीएमपी'कडे पुरेसे मनुष्यबळ असतानाही स्वच्छता होताना दिसत नाही. बसेसची अवस्था खूपच वाईट दिसत आहे. कागदोपत्री सर्वकाही सुरळीत दिसते. प्रत्यक्षात मात्र खराब झालेल्या बसेस दिसतात. काही दिवसांमध्येच हे चित्र बदललेले दिसेल.

Web Title: Tukaram Mundhe, chairman of PMP visits Sakal's Pune office