खेडमध्ये १२ हजार ८३२ अर्ज प्रलंबित

खेडमध्ये १२ हजार ८३२ अर्ज प्रलंबित

राजगुरुनगर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेबाबत शासकीय स्तरावर अनास्था असून, खेड तालुक्‍याची एकत्रित माहिती सरकारच्या कोणत्याही विभागाकडे उपलब्ध नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत तालुक्‍यातून एकूण ३५ हजार ५३२ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी मेअखेर २२ हजार ७०९ जणांचे कर्जमाफी अर्ज मंजूर झाले होते आणि १२ हजार ८३२ अर्ज नामंजूर किंवा प्रलंबित राहिले आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक वगळता इतर बॅंकांची तालुका स्तरावर एकत्रित माहिती उपलब्ध नाही. सहकार खात्याकडे या बॅंकांनी माहिती पाठविली नसल्याचे खेडचे सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांनी सांगितले. खेड सहायक निबंधक कार्यालयाकडे फक्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे तालुक्‍यात एकंदर कर्जमाफी नेमकी किती शेतकऱ्यांना मिळाली आणि किती जणांना नाकारली गेली, ते सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत राबविल्या गेलेल्या कर्जमाफी योजनेकरिता खेड तालुक्‍यातून एकूण ३५ हजार ५३२ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी मेअखेर २२ हजार ७०९ जणांचे कर्जमाफी अर्ज मंजूर झाले होते आणि १२ हजार ८३२ अर्ज नामंजूर किंवा प्रलंबित राहिले आहेत. शासनाच्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे बहुतांश अर्ज नामंजूर झाले आहेत. एकूण ४४ कोटी ६ लाख ५६ हजार १६३ रुपये रकमेची कर्जमाफी मिळाली. त्यामध्ये १३ कोटी ९५ लाख रुपयांची कर्जमाफी दीड लाख रुपयांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाली. २६ कोटी ७९ लाख रुपयांची कर्जमाफी नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर म्हणून मिळाली आहे. दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना ३ कोटी ३० लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे, अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी विलास भास्कर यांनी दिली.  

किचकट अटींचा फटका
सुरवातीला हातांचे ठसे आधार कार्डाशी जुळत नसल्यामुळे लोकांना अडचणी आल्या. नंतर सर्व्हर हळू चालत असल्यामुळे लोकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. तसेच, सरसकट पत्नीही सहअर्जदार असण्याची अट होती. पुढे ती अट बदलण्यात आली. शासनाने वेळोवेळी मुदतवाढ दिल्याने तांत्रिक बाबींचा फटका बसल्यामुळे कर्जमाफी मिळाली नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या फारशी नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com