उजनी धरण आज ‘मायनस’मध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

इंदापूर - उजनी धरण आज (ता. २५) उपयुक्त साठ्यातून मृत साठ्यात जात आहे. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. दरम्यान, गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण यंदा प्रथमच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘मायनस’मध्ये जात आहे. 

इंदापूर - उजनी धरण आज (ता. २५) उपयुक्त साठ्यातून मृत साठ्यात जात आहे. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. दरम्यान, गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण यंदा प्रथमच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘मायनस’मध्ये जात आहे. 

दरम्यान, धरणाचे पाणी देताना प्रथम प्रकल्पग्रस्तांना बारमाही पाणी द्यावे, तसेच पाणीवाटपात प्राधान्य द्यावे, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.   
गतवर्षी उजनी धरण व पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. धरणाची साठवणक्षमता ११७.५ टीएमसी असतानाही १२३ टीएमसी पाणीसाठा टप्प्याटप्याने करण्यात आला होता. त्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्याची सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचा अमाप वापर झाला.

मात्र, पुढील वर्ष निवडणुकांचे असल्याने उजनीचे पाणी पेटणार आहे. सोलापूर शहरासाठी बंद पाइपमधून पाणी दिल्यास १५ ते २० टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. धरणाच्या पोटात असलेले ५१ हजार कोटी रुपयांचे काळे सोने काढून धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. 

उजनी धरण व्यवस्थापनाचे सहायक अभियंता एस. एस. नगरे यांच्या माहितीनुसार गुरुवारी धरणातील पाणीपातळी ४९१.६५ मीटर होती. धरणात एकूण साठा ६३.९० टीएमसी असून, उपयुक्त पाणीसाठा ०.२५ टीएमसी इतका आहे. 

कालव्यातून ३३५० तर, बोगद्यातून ७०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. बाष्पीभवनाचा वेग ७.३२ एमएम असून, ७ टीएमसी पाणी बाष्पीभवनाद्वारे कमी झाले आहे. धरणातून कालव्यात विसर्ग सुरू असल्याने धरण आज उपयुक्त साठ्यातून मृत साठ्यात जाणार आहे. धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात येत असल्याने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. 

शेतकऱ्यांना नदीपात्रात पाइप वाढवावे लागत आहेत. धरणातील पाण्यावर किमान ४५ साखर कारखाने, तसेच दहा औद्योगिक वसाहती चालतात. 

Web Title: ujani dam water