टेकडीफोड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

पुणे - शहराचे दक्षिणद्वार असलेल्या कात्रज घाटातील नयनरम्य डोंगराचीही आता लचकेतोड सुरू झाली आहे. घाट परिसरातील भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी आणि मांगडेवाडी येथे रात्रंदिवस टेकड्या फोडण्याचा धडाका बांधकाम व्यावसायिकांनी लावला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ही बाब पुढे आली आहे. या ठिकाणी गोदामे आणि बहुमजली इमारती उभ्या राहत असतानाही प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

पुणे - शहराचे दक्षिणद्वार असलेल्या कात्रज घाटातील नयनरम्य डोंगराचीही आता लचकेतोड सुरू झाली आहे. घाट परिसरातील भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी आणि मांगडेवाडी येथे रात्रंदिवस टेकड्या फोडण्याचा धडाका बांधकाम व्यावसायिकांनी लावला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ही बाब पुढे आली आहे. या ठिकाणी गोदामे आणि बहुमजली इमारती उभ्या राहत असतानाही प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावर कात्रज घाटापूर्वी टेकड्या फोडून दुतर्फा अनधिकृत दुकाने, स्टॉल्स आणि गोडाऊन उभी करण्यात आली आहेत, तर भिलारेवाडी येथे मोठ्या प्रमाणावर डोंगर फोडून जमीन समतलीकरण केले जात आहे. कात्रज गावठाणालगत पूर्वेकडे गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, बालवडकर पाटील वस्ती येथे टेकडीमाथा व उतारावर जमीन समतलीकरण करून छोटी घरे तसेच बहुमजली इमारतींची बांधकामे सुरू आहेत. अत्यंत धोकादायक उंचवट्यावर, उतारावर बहुमजली इमारती, औद्योगिक कारणासाठी मोठी गोडाऊन बांधली जात आहेत. त्यासाठी जेसीबी आणि पोकलॅंडच्या साहाय्याने टेकड्या फोडण्याचे काम सुरू आहे. 

स्वस्तात जागा आणि फ्लॅट
नाव न छापण्याच्या अटीवर एका महिलेने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, ‘कात्रज गावाच्या तुलनेत गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, बालवडकर पाटील वस्ती परिसरात स्वस्तात जागा आणि फ्लॅट मिळत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून टेकड्या फोड सुरू असून, अवैध बांधकामेही जोरात सुरू आहेत. त्यांच्या आवाजाचा आणि धुळीचा आम्हाला, आमच्या मुलाबाळांना त्रास होत आहे.’

प्रदूषणाचा मोठा फटका
ज्येष्ठ नागरिक म्हणाले, ‘‘अनेक वर्षांपूर्वी काही बांधकाम व्यावसायिकांनी आमच्याकडून अल्पदरात जमिनी विकत घेतल्या. परंतु आता जमिनीलगतच्या डोंगरांना फोडून सुरवातीला खडी वाहिली आणि आता त्या ठिकाणी उद्योगांसाठी गोडाऊन बांधण्याचे काम सुरू केले आहे. काही ठिकाणी इमारती बांधल्या जात आहेत. यामुळे आवाजाचा त्रास तर होतोच, शिवाय पाणी आणि हवा प्रदूषणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे.’’

सहा महिन्यांपासून टेकडीफोड सुरू
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून दिवसरात्र टेकड्या फोडणे सुरूच आहे. सुरवातीला टेकड्यांना कापून रस्ते तयार केले. मग टेकड्या फोडून जमिनीचे सपाटीकरण करून चार ते पाचमजली इमारतींचे काम सध्या सुरू आहे. विशेष बाब म्हणजे बांधकाम परिसरात संबंधित बांधकामांची माहिती देणारे फलकही लावलेले नाहीत. असे असतानाही टेकडीफोड, अवैध बांधकामे, प्लॉट बनवून त्याची विक्री कोणाच्या पूर्वपरवानगीने सुरू आहे, याची शहानिशा होत नाही. या विरोधात कोणाकडे तक्रार करायची, याचीदेखील माहिती नसल्याचे दिसून आले.

Web Title: unauthorized constructions in katraj