उरळी देवाची गाव लवकरच महापालिकेत येईल - महापौर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पुणे - महापालिकेत उरळी देवाची गाव सामावून घेण्याच्या प्रक्रियेला आता गती येण्याची शक्‍यता असून, या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी सांगितले. गावात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी गेल्या आठ वर्षांत सुमारे 66 कोटी रुपये खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे - महापालिकेत उरळी देवाची गाव सामावून घेण्याच्या प्रक्रियेला आता गती येण्याची शक्‍यता असून, या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी सांगितले. गावात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी गेल्या आठ वर्षांत सुमारे 66 कोटी रुपये खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले.

फुरसुंगी आणि उरळी देवाची गावांच्या हद्दीत साधारणत: 1990-91 पासून कचरा डेपो आहे. त्याच्या मोबदल्यात दोन्ही गावांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे करण्यात येतात. पाणी, रस्त्यांसह अन्य सेवा-सुविधा पुरविण्यात येतात. त्यावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात; परंतु कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केला. त्यावरून अनेक वेळा आंदोलनही झाले. त्यात, ग्रामस्थांच्या मागण्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, उरळी देवाची महापालिकेत सामावून घेण्याची मागणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याआधी केली; परंतु त्यावर आतापर्यंत विचार झाला नव्हता. परंतु, विकासकामांमुळे गावात होणाऱ्या खर्चाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत सामावून घेण्याच्या दृष्टीने पावले टाकली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील ग्रामस्थांच्या मागण्यांच्या पार्श्‍वभूमीवर महापौर टिळक यांच्यासमवेत बैठक झाली. तित विविध मागण्यांवर चर्चा झाली.

'कचरा डेपोच्या बदल्यात दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात येतात. त्यावर गेल्या आठ वर्षांत 66 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आणखी काही कामे करण्याचा ग्रामस्थांचा आग्रह आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते महापालिकेत घेण्याचा विचार आहे. त्याबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल,'' असेही महापौर टिळक यांनी सांगितले.

गावांना रोज 50 टॅंकरद्वारे पाणी
फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन्ही गावांमध्ये सध्या रोज 40 टॅंकरमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यात वाढ करण्याची मागणी दोन्ही ग्रामस्थांनी केल्यानंतर त्यात दहा टॅंकरची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या गावांना रोज 50 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येकी एक हजार लिटर क्षमतेच्या शंभर पाण्याच्या टाक्‍याही देण्यात येणार असल्याचेही महापौर मुक्‍ता टिळक यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या अन्य मागण्या आहेत. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: urali devachi involve in municipal