उरण-भीमाशंकर-शिरूर राज्यमार्ग अंतिम टप्प्यात

highway.
highway.

राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय हरित लवादाने ३१ जानेवारी रोजी रस्त्यासाठी वनक्षेत्र देण्यास अटींवर मान्यता दिली आहे. तळपेवाडी ते पडारवाडी पर्यंत भूसंपादन व सर्वेक्षण आणि सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीच्या अर्थसंकल्पातून ६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबत माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली. या रस्त्यामुळे आदिवासी पश्चिम पट्ट्याच्या विकासाचे महाद्वार खुले होईल, असे गोरे म्हणाले.  

तसेच या प्रस्तावित मार्गामधील वाळद ते भोरगिरी, शिरगाव ते तळेघर, पढारवाडी ते वांद्रे आणि आंबोली ते औंढे या सध्याच्या रस्त्यांच्या कामांसाठी ५ कोटी ८६ लाख रुपयेही अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहेत. राज्यमार्ग क्र.१०३ उरण-पनवेल-वांद्रे-आंबोली-कुडे-घोटवडी-शिरगाव-मंदोशी-भिमाशंकर-वाडा-खेड-शिरूर; असे या रस्त्याचे नाव आता शासकीय दफ्तरी असेल, असेही त्यांनी सांगितले. 

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर या पवित्र तीर्थ क्षेत्राकडे मुंबईहून कर्जतमार्गे येण्यासाठी रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या रस्त्यामुळे मुंबई ते भीमाशंकर अंतर कमी होणार आहे. त्याबरोबर दळणवळण वाढून पश्चिम खेड तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे. या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. हा रस्ता मंजूर करण्यासाठी आमदार सुरेश गोरे यांनी अलीकडच्या काळात प्रयत्न केल्यामुळे सदर रस्त्यासाठी ६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, लवकरच या रस्त्याचे भूसंपादन आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. 

आराखडा

  • रायगड जिल्ह्याच्या हद्दीत ९०. ३९ किलोमीटर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीत ७९.३९ किलोमीटर रस्ता भीमाशंकरपर्यंत असणार आहे. दोन्ही बाजुंना रस्ता आहे. फक्त अभयारण्याच्या भागात काम करून रस्ता जोडायचा आहे. 
  • यासाठी मावळ आणि खेड या दोन्ही तालुक्यात मिळून १३.२३ हेक्टर खासगी भूसंपादन आणि १६.४६ हेक्टर वन भूसंपादन करावे लागणार आहे. 
  • संयुक्त मोजणी होऊन निवाडा प्रक्रिया झाली असून खासगी भूसंपादनाची रक्कम भूसंपादन अधिकारी यांचेकडे जमा झाली आहे. 

आमदार सुरेश गोरे यांचा पाठपुरावा

  • या रस्त्याच्या कार्यवाही प्रक्रियेची माहिती आणि प्रगती अहवाल आणि वन व महसुल खात्याकडचा यासंदर्भातील प्रगतिअहवाल याविषयी २०१४ च्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. 
  • गोरे यांनी ९ डिसेंबर २०१६ रोजी हिवाळी अधिवेशनात या रस्त्याच्या मंजुरीसाठी औचित्याचा मुद्दा मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले.
  • त्यांनी २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रस्त्याची निविदा मंजूर असूनही हरित लवादाच्या मान्यतेअभावी काम थांबल्याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. 
  • तसेच रस्त्याच्या कामासाठी संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. 
  • नागपूरच्या हरित लवादाकडील खटल्याच्या कामकाजासाठी लक्ष घातले. 
  • वनखात्याच्या जमिनीला पर्यायी जमीन म्हणून खेड तालुक्यातील पूर येथील जमीन मिळवून दिली. सध्या तिच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे. 
  • अर्थसंकल्पातून निधी मंजूर करून घेतला.  

यांचेही योगदान मोलाचे

  • माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांच्या काळात प्रस्ताव तयार. त्यावेळी वनक्षेत्राची अडचण आली म्हणून स्वतः पवार यांनी २००० साली नागपूरच्या हरित लवाद खंडपीठाकडे रिट याचिका दाखल केली. 
  • माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या कार्यकाळात, सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पात हे काम प्रथमत: समाविष्ट केले गेले. तसेच खेड व मावळ तालुक्यातील वन जमिनिसाठीचा एकंदरीत प्रस्ताव मार्ग पुण्याच्या प्रकल्प विभागाकडून २१ ऑगस्ट २००८ रोजी वनसंरक्षक,पुणे विभाग यांचेकडे सादर करण्यात आला.  
  • भाजपचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे आणि अतुल देशमुख यांनीही सरकारकडे पाठपुरावा केला. 
  • पूर्वी पश्चिम भागातील किसन गोपाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्जत भीमाशंकर रस्ता संघर्ष समिती स्थापून अनेकदा आंदोलने केली.    

भीमाशंकर येथे येण्याकरिता, असे तीन मार्ग सध्या उपलब्ध आहेत.

  • मुंबई-कल्याण-माळशेज-नारायणगाव-मंचर-भीमाशंकर- २७८ किमी
  • मुंबई-लोणावळा-वडगाव-चाकण-राजगुरूनगर-मंचर-भीमाशंकर – २४० किमी
  • मुंबई-लोणावळा-वडगाव-चाकण-राजगुरूनगर-शिरगाव-तळेघर-भीमाशंकर -२२३ किमी
  • प्रस्तावित उरण-पनवेल-कर्जत-कोठीम्बे-सावळे-तळपेवाडी-वांद्रे-आंबोली-कुडे-घोटवडी-धामणगाव-तळेघर-भीमाशंकर हे अंतर १७० किमी आहे. त्यामुळे  ५३ ते १०८ किलोमीटर अंतर वाचू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com