शालेय जीवनातील वाचनाचा फायदा - डॉ. माशेलकर

शालेय जीवनातील वाचनाचा फायदा - डॉ. माशेलकर

पिंपरी - ‘‘बालवयापासूनच मला वाचनाची गोडी लागली. शालेय जीवनातही मी प्रचंड वाचन केले. त्याचा मला पुढील आयुष्यात मोठा फायदा झाला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी वाचत राहील. तुलनेने लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. मात्र, सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी आयुष्याच्या शेवटापर्यंत साधना केली पाहिजे,’’ असे मार्गदर्शन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

छात्र प्रबोधन रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘राज्यस्तरीय भव्य कुमार साहित्य संमेलना’चे प्रमुख उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. या वेळी ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट, कार्याध्यक्ष डॉ. प्र. ल. गावडे, निगडी केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर, उपकेंद्रप्रमुख मनोज देवळेकर, संमेलनाचे मुख्य संयोजक महेंद्र सेठिया, शैलजा देशमुख आदी होते. या प्रसंगी अरणकल्ले यांच्या हस्ते प्रबोधिनीच्या १५ पुस्तकांचे प्रकाशन झाले.

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘आज जग झपाट्याने बदलत आहे. ‘आयपॅड’, ‘व्हॉट्‌सॲप’, ‘फोर-जी’, ‘फेसबुक’ हे शब्द परवलीचे झाले आहेत. येणाऱ्या दहा वर्षांतील चित्र काय असेल, याची कल्पना नाही. मात्र, आपण त्यासाठी तयार असले पाहिजे. या सर्वांत साहित्यही समजून घेतले पाहिजे.  दैनंदिन आयुष्यात विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण वाटायला हवे. त्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल घडविणे आवश्‍यक आहे. मुलांचे कुतूहल वाढेल अशा प्रयोगांचा शोध घेतला पाहिजे. आपल्याकडील शालेय अभ्यासक्रमात एका प्रश्‍नाला एक उत्तर दिले जाते. देशातून अधिकाधिक सिद्धांत मांडले जातील, अशा दिवसाची मला प्रतीक्षा आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातून कामे झाली पाहिजेत. त्यासाठी उत्तमतेचा ध्यास, सामूहिक कृती, गटचर्चा, राष्ट्रप्रेम आदी मूल्ये रुजविणे क्रमप्राप्त आहे.’’ 

अरणकल्ले म्हणाले, ‘‘वाचन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींशी समरस होणे म्हणजे साहित्यवाचन. विचारांच्या खोलीतून ते व्हायला हवे. साहित्याच्या सहवासातून रसिकता आकाराला येते; तर व्यासंगातून व्यक्तिमत्त्वाला आकार येतो. जगणे खऱ्या अर्थाने आनंददायी करायचे असल्यास कोणत्याही प्रकारचे साहित्य समजून घेतले पाहिजे.’’ छात्र प्रबोधिनीचे प्रबोधक आणि संपादकांच्या कृतिशीलतेची अरणकल्ले यांनी प्रशंसा केली. ‘‘हे केवळ कुमारांचे मासिक नसून, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडणारे आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. ‘‘महापालिकेच्या मराठी शाळेमधून माझे संपूर्ण शालेय शिक्षण झाले.

पुनर्जन्म झाल्यास मी पुन्हा महापालिकेच्या शाळेत मराठीतून शिक्षण घेईल. मराठीसारखी दुसरी भाषा नाही,’’ अशी भावना अरणकल्ले यांनी व्यक्त केली. वाचनाच्या गोडीतूनच मला लेखनाचीही आवड निर्माण झाली. सातवीमध्ये एका मासिकासाठी केलेल्या संदेश लेखनासाठी पहिले बक्षीसही पटकावल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. 

आज संमेलनात...
स. ८.१५ :     उपासना व विद्यार्थ्यांचे वाचन
स. ९.३० :     विद्यार्थ्यांचा साहित्य कट्टा
स. ११.१५ :     कर्तृत्ववान व्यक्तींच्या मुलाखती
दु. २ :     कल्पक स्पर्धा
दु. ३.४५ :     समारोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com