अकरा हजार गावे दुष्काळमुक्त - बाळा भेगडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

वडगाव मावळ - राज्य शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार या क्रांतिकारी योजनेमुळे गेल्या तीन वर्षांत राज्यातील अकरा हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून, याच योजनेतून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा विश्‍वास पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

येथील मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत सहावे पुष्प गुंफताना आमदार भेगडे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीहरी डांगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती निवृत्ती शेटे, एकनाथराव टिळे, मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवी आचार्य, अध्यक्ष ॲड. विजय जाधव आदी उपस्थित होते.

दुष्काळमुक्त महाराष्ट्र या विषयावर बोलताना भेगडे यांनी दुष्काळमुक्तीसाठी राज्य शासन राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, दुष्काळ व चक्रवाढ व्याज पद्धतीच्या कर्जाच्या कचाट्यात सापडल्याने अनेक भागातील शेतकरी कर्जबाजारी बनला आहे. त्यामुळे त्याला कर्जमुक्त करण्यासाठी शासन कायमस्वरूपी उपाययोजना राबवत आहे. त्यात जलयुक्त शिवार या सर्वांत क्रांतिकारी योजनेचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांत सुमारे ४ हजार ७०० कोटी रुपये खर्चून अकरा हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होऊन साडेपंधरा लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार शेती उत्पन्न ४० हजार कोटींनी वाढले आहे. ही आता लोकचळवळ झाली असून इतर राज्यांनीही या योजनेचे अनुकरण करण्यास सुरवात केली आहे. या योजनेमुळेच संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने देशात सर्वांत जास्त म्हणजे ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी घोषित केली आहे. अगोदरच्या शासन काळात सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले. ते टाळण्यासाठी व गरजू शेतकऱ्यांनाच लाभ होण्यासाठी कर्जमाफी योजनेत काही निकष शासनाने घातले आहेत. शेतकऱ्यांना बियाणे, शेती अवजारे यासाठी मदत केली जात आहे. मागेल त्याला शेततळे, शेतीपंपासाठी वीज जोड देण्याचे शासनाचे धोरण आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी अनेक ठिकाणी संत सावतामाळी आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेटे व डॉ. डांगे यांनीही मनोगत व्यक्त केले. अनंता कुडे यांनी सूत्रसंचालन केले.