बाळ, बाळंतीणीची नको आता चिंता!

बाळ, बाळंतीणीची नको आता चिंता!

पुणे - प्रसूतीसाठी गर्भवतीला महापालिकेच्या रुग्णालयात आणलंय अन्‌ प्रसूती गुंतागुंतीची असेल तर नातेवाइकांच्या हृदयाचे ठोके चुकणारच...पण आता चिंता सोडा. तुमचं बाळ आणि बाळंतीण सुखरूप असेल. कारण, महापालिकेच्या रुग्णालयांतील सर्व प्रसूतिगृहांत आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेमार्फत प्रसूती करणारे डॉक्‍टर थेट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतागुंतीची प्रसूतीही सहजतेने करू शकणार आहेत. मग ही प्रसूती सर्वसाधारण असो वा सिझर.    

महापालिकेच्या रुग्णालयांत गर्भवतींना योग्य उपचार मिळत नसल्याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. 

पालिकेच्या १७ रुग्णालयांतील प्रसूतिगृहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि टेलिकॉन्फरसिंगने जोडण्यात आली आहेत. त्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासह अन्य शहरांमधील स्त्रीरोग तज्ज्ञांना सामावून घेण्यात आले आहे. 

महापालिकेच्या रुग्णालयात विनामूल्य सेवा असल्याने प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेकडे वर्षाकाठी २२ हजार गर्भवतींची नोंदणी होते. या सर्व गर्भवतींना दाखल करून घेणे अपेक्षित असतानाही तोकड्या यंत्रणेचे कारण सांगत गर्भवतींना ऐन वेळी अन्य रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला स्थानिक अधिकारी देतात. प्रसूतीसाठी जेमतेम तास-अर्धा तास असतानाही गर्भवतींवर उपचार होत नसल्याचे आढळून आले होते. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या बेजबाबदारपणामुळे शुभांगी जानकर या गर्भवतीला जीव गमवावा लागला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रसूतिगृहात गर्भवतींची हेळसांड होत असल्याचे चित्र ‘सकाळ’ने ‘तिच्या कळा’ या वृत्तमालिकेतून मांडले होते. त्याची दखल घेऊन आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. 

अशी आहे यंत्रणा 
प्रसूतिगृहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि टेलिकॉन्फरन्सिंगद्वारा बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाशी जोडली आहेत. एखाद्या रुग्णालयात प्रसूतीवेळी अडचणी येत असल्यास उपचार करणारे डॉक्‍टर तज्ज्ञांशी बोलू शकतील, अशा प्रकारे सल्ला घेण्यासाठी प्रसूतिगृहांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. भवानी पेठेतील सोनावणे हॉस्पिटलमध्ये या यंत्रणेची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

रुग्णालयात येणाऱ्या गर्भवतीची पहिल्या दहा मिनिटांत तपासणी करून लगेचच उपचार सुरू करण्यात येणार आहेत. तशा सूचना सर्व डॉक्‍टरांना केल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा अन्य नामांकित खासगी रुग्णालयांशी जोडता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- राजश्री नवले, अध्यक्ष,  महिला व बालकल्याण विभाग, महापालिका

स्त्रीरोग तज्ज्ञ कमी असल्याने गर्भवतींवरील उपचारावेळी अडचणी येत होत्या. त्यामुळे ‘सिझर’ची गरज भासणाऱ्या महिलांना ससून रुग्णालयात पाठवावे लागत होते. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि टेलिकॉन्फरन्सिंगमुळे स्थानिक डॉक्‍टरांना स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संपर्कात राहून योग्य उपचार करणे शक्‍य झाले आहे. 
- डॉ. संजीव वावरे,  सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com