करूया जागर मतदानाचा, जाऊनिया घरोघरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पिंपरी - ‘‘प्रबळ करण्या राष्ट्र आपुले, मतदान उपाय त्यावरी..
करूया जागर मतदानाचा, जाऊनिया घरोघरी...’’ 
ही शोभा जोशी यांची काव्यरचना. मतदानाविषयी जनजागृती करणाऱ्या अशा विविध कविता सादर करून गुरुवारी (ता. १६) कवींनी मतदानाबाबत प्रबोधन केले.

पिंपरी - ‘‘प्रबळ करण्या राष्ट्र आपुले, मतदान उपाय त्यावरी..
करूया जागर मतदानाचा, जाऊनिया घरोघरी...’’ 
ही शोभा जोशी यांची काव्यरचना. मतदानाविषयी जनजागृती करणाऱ्या अशा विविध कविता सादर करून गुरुवारी (ता. १६) कवींनी मतदानाबाबत प्रबोधन केले.

साहित्य संवर्धन समिती आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड स्टेशन येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या सभागृहात वेगळ्या विषयावरील कवी संमेलन झाले. महापालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदाडे, समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, कथाकार राज अहेरराव, प्रतिभा इन्स्टिट्यूटच्या उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, भाषा आणि संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. रूपा शहा, ‘सकाळ’चे बातमीदार दीपेश सुराणा, कवी अनिल दीक्षित, रमेश भोसले आदी उपस्थित होते. नवमतदार उत्कर्षा यादव आणि दीपक विश्‍वकर्मा यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कवी संमेलनाचे उद्‌घाटन झाले. कवी संमेलनासाठी कमला एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया यांचे सहकार्य मिळाले. उपस्थितांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. महापालिकेतर्फे मतदान जनजागृतीवर तयार केलेले गीत उपस्थितांना ऐकविण्यात आले. बोदाडे यांनी मतदानाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, ‘‘साहित्यिक, कवी यांनी मतदान जनजागृतीसाठी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. नागरिकांना प्रत्येक प्रभागात चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रंगाची मतपत्रिका आहे. चार बटन दाबल्यानंतर मतदानाची नोंद होईल.’’

‘‘मतदानाच्या दिवशी केवळ सुटीचा आनंद न घेता नागरिकांनी मतदान करावे,’’ असे आवाहन मुळे यांनी केले. अहेरराव म्हणाले, ‘‘मतदान हे श्रेष्ठ दान आहे. त्याचे पावित्र्य जपावे. मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे.’’

‘‘मत विकून देशाशी करायची न गद्दारी, पुढच्या पिढीचे ना व्हायचे मारेकरी..’’ या ‘झिंगाट’ गीताच्या चालीवरील कवी अनिल यांच्या कवितेला चांगली दाद मिळाली. आय. के. शेख यांच्या ‘आता वाढवा मतदान टक्का..’ या विनोदी ढंगाच्या कवितेने रसिक हास्यरसात बुडाले. ‘‘लोकशाहीची तुम्ही शान, देश उज्ज्वल, घडवू महान.. चला करू मतदान..’’ ही कवी दीपेश यांची रचना उत्तम होती. ‘दे रे दे रे मतदारा मला मताचे रे दान..’ ही सुहास घुमरे यांची तर, ‘मतदान करूया, चला मिळुनी सारे..’ ही संगीता झिंजुरके यांची कविता लक्षवेधी ठरली. कंक, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, माधुरी विधाटे, मधुश्री ओव्हाळ यांनीही विविध रचना सादर केल्या. घुमरे यांनी प्रास्ताविक केले. झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रूपा शहा यांनी आभार मानले.