दिग्गजांचा सहवास हे माझे भाग्य : विजय घाटे

Vijay Ghate
Vijay Ghate

पुणे : ''तबलावादनाच्या निमित्ताने अनेक दिग्गजांचा सहवास लाभला, हे माझे भाग्य आहे. या व्यक्तींच्या सोबतीला त्यांची संगीताची भाषा मला आत्मसात करता आली, ती भाषा माझ्यात रुजत गेली आणि त्या विषयीच्या मनन-चिंतनातून मी माझे वादन समृद्ध करीत गेलो. संगीत क्षेत्रातील या दिग्गजांमुळे माझे वादन अधिक सकस होण्यास मोठाच हातभार लागला,'' अशी भावना तबलावादक विजय घाटे यांनी व्यक्त केली. 

'भारतीय विद्याभवन' आणि 'इन्फोसिस फाउंडेशन'तर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित 'तालसंवाद' या कार्यक्रमात घाटे बोलत होते. कार्यक्रमाद्वारे घाटे यांच्या कारकिर्दीचा सांगीतिक मागोवा घेण्यात आला. उमेश मोघे यांनी घाटे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. भारतीय विद्याभवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते. 

घाटे म्हणाले, ''मनोरंजन म्हणून आणि अभ्यास म्हणून तबलावादन ऐकणे यात फरक आहे. अभ्यास म्हणून आवडत्या आणि आदर्श कलाकाराचे वादन खूपदा ऐकणे आवश्‍यक आहे. गायन, नृत्य, बासरी, सतार, संतूर अशा कोणत्याही वाद्याबरोबर तबल्याची साथ देताना मुख्य कलाकाराच्या विचारांशी आपले वादन एकरूप झाले पाहिजे. मुख्य कलाकाराच्या गायन, नृत्य किंवा वादनावर प्रभाव न टाकता त्याचा साथीदार म्हणून साथ दिली पाहिजे. सगळ्या घराण्यांचा अभ्यास करून साथसंगत करीत असताना त्या-त्या घराण्याच्या चौकटीत स्वतःला आणि स्वतःच्या कलेला बसविणे गरजेचे असते, तरच आपण विविध घराण्यांतील गायक, वादक आणि नर्तकांना साथसंगत करू शकतो.'' 

उस्ताद झाकिर हुसेन यांचा एक जाहीर कार्यक्रम ऐकल्यानंतर मी तबल्याच्या अक्षरशः प्रेमात पडलो. त्या मोहिनीतून मी आजही बाहेर पडू शकलेलो नाही. माझ्या तबलावादनात उस्ताद झाकिर हुसेन यांचा सिंहाचा वाटा आहे, असेही घाटे यांनी सांगितले. 

घाटे यांनी तबलावादनाच्या काही प्रात्यक्षिकांद्वारे दिलेल्या कलानुभूतीला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यांना अभिषेक शिनकर यांनी साथसंगत केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com