विरोधकांनी यशाचे दावे तपासावेत - राज्यमंत्री शिवतारे

विरोधकांनी यशाचे दावे तपासावेत - राज्यमंत्री शिवतारे

सासवड - नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले. शिवसेनेकडे १३ पैकी फक्त वनपुरी ग्रामपंचायत होती. आता, शिवसेनेला तीन ग्रामपंचायती सरपंचपदांसह बहुमताने मिळाल्या आहेत. इतर तीन ग्रामपंचायतीत उपसरपंच झाले. ग्रामपंचायतीचा निकाल लागताच काँग्रेस - राष्ट्रवादीने स्वतःची पीछेहाट झाकण्यासाठी केलेले दावे गावांत जाऊन तपासावेत, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. 

सासवड (ता. पुरंदर) येथील तालुका पंचायत समिती सभागृहात नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार शिवतारेंच्या हस्ते झाला. १६ गावांना व्यायामशाळा साहित्य आणि ६ गावांना भजन साहित्याचे वाटपही झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सभापती अतुल म्हस्के, दिलीप यादव, ज्योती झेंडे, शालिनी पवार, दत्ता काळे, सदस्य रमेश जाधव, अर्चना जाधव, नलिनी लोळे, दादा घाटे, कुंडलिक जगताप, नवनिर्वाचित सरपंच कृष्णा झुरंगे, दत्तात्रेय पवार, उषा पवार, शिवाजी पवार उपस्थित होते.  

खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पालखी महामार्गावर खड्ड्यासह सेल्फी घेऊन सोशल मीडियावर टाकले होते. मात्र केंद्राकडे वर्ग झालेल्या या रस्त्याची जबाबदारी त्यांची असूनही त्यांना दुरुस्ती करता आली नाही. आम्ही निधी टाकून हा रस्ता चकाचक केला. आता त्यांनी या रस्त्यासह सेल्फी काढून आनंद व्यक्त करावा, अशी कोपरखळी शिवतारे यांनी मारली. 
अपूर्ण पुरंदर उपसा योजना पूर्ण केल्याने आज १४ हजार हेक्‍टर क्षेत्र भिजत आहे. आता पुरंदर उपसासह जनाईच्या शेतकऱ्यांना अवघ्या १९ टक्के पट्टीची आकारणी केली जाते. गुंजवणी धरणाचे बांधकाम पूर्ण केले. आता जलवाहिनीसाठी १,०३५ कोटींची मंजुरी दिली असून, काही दिवसांत काम सुरू होईल. जलसंधारणातून पुरंदरमध्ये ५२ कोटी रुपयांचे सिमेंट बंधारे बांधले, असे शिवतारे यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचे नुकसान नाही
पुरंदर तालुक्‍यातील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे एकाही शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार नाही. विमानतळामुळे सर्वांगीण विकासास मदत होणार आहे. ज्यांनी लोकांच्या जमिनी विकल्या असे एजंट आता या भागात पुढारी झाले असल्याची टीका विजय शिवतारे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com