मी गुंड नव्हे; पोलिस होणार

vinod tawde
vinod tawde

पुणे - वर्गात मुलांना विचारले की तुम्ही मोठेपणी काय होणार? त्यावर कुणी सांगितले डॉक्‍टर, कुणी अन्य काही. पण एक मुलगा म्हणाला, "मी गुंड होणार, मला मारामारी करायला आवडते.' हे उत्तर धक्कादायक होते. मग मुलांची गटचर्चा घेतली आणि गुंड म्हणजे काय, याचा अर्थ त्या मुलास सांगितला. काही दिवसांनी पुन्हा त्याला काय होणार, असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी पोलिस होणार...

रत्नागिरी जिल्ह्यातील संदीप निरवारगे या शिक्षकाचा हा अनुभव. राज्याचा शिक्षण विभाग आणि शांतिलाल मुथा फाउंडेशन यांनी संयुक्तपणे राज्याच्या 34
जिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन हा उपक्रम राबवीत आहेत. यामध्ये मुलांमध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच मूल्ये रुजविली जातात. सुमारे दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या उपक्रमाचा आढावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिरगाव येथील साई मंदिर परिसरातील सभागृहात घेतला. प्रयोगशील शिक्षक त्यासाठी राज्यभरातून आले होते. प्राथमिक शिक्षण मूल्यवर्धन उपक्रमांमुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यात झालेल्या बदलांबाबत तावडे यांनी शिक्षकांशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेतली. या वेळी शिक्षकांनी काही अनुभव सांगितले. या उपक्रमामुळे शाळा चार भिंतींच्या बाहेर आली आहे. मुलांना चांगल्या सवयी, शिस्त लागली आहे. शिक्षकही विद्यार्थी होऊन अध्यापनात रस घेऊ लागले आहेत. शिक्षक उड्या मारून, फुगे उडवून शिकवू लागल्याने मुलांशी जवळीक वाढली आहे. आम्ही बदललोय, मुलेही बदलू लागली आहेत, असे अनुभव शिक्षक, शिक्षिकांनी सांगितले.

सैराटपेक्षा शाळा बघेल!
करमाळा तालुक्‍यातील एका शिक्षकाने त्यांचे अनुभव सांगताना, सैराट सिनेमातील मैदान आमच्याच शाळेचे असल्याचे सांगितले. त्यावर, तावडे यांनी त्या शिक्षकाला चित्रपट पाहिला का, विचारले. त्यांनी हो म्हटल्यानंतर, मी अजून बघितला नसल्याचे तावडे म्हणाले. बघा ना सर, असे त्या शिक्षकाने म्हटले. सैराट पाहण्यापेक्षा शाळा बघेल, असा मिश्‍किल टोला तावडे यांनी लगावला.

शिक्षक हाच मूल्यवर्धित शिक्षणाचा दूत आहे. त्यांनी मूल्ये रुजविली की मुले स्वतःच आयुष्यात आणि समाजात चांगले बदल घडवतील. मूल्यवर्धन हा उपक्रम राज्यभरात जिल्हा परिषदांच्या शाळेत राबविला जात आहे. पारंपरिक शिक्षणाशिवाय मुलांमध्ये मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न आहे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com