मुलांना पाहताच कैद्यांचे डोळे पाणावले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

येरवडा कारागृहातील प्रसंग; गळाभेट कार्यक्रमांर्तगत अडीचशे मुले भेटली वडिलांना
विश्रांतवाडी - वडिलांना पाहण्यासाठी आसुसलेली नजर...ते दिसल्यावर धावत जाऊन त्यांना मारलली मिठी.... गळ्यात दाटलेले हुंदके.... डोळ्यांत आसवे... हे वर्णन कुठल्या हिंदी सिनेमातील प्रसंगाचे नाही... तर प्रत्यक्षात कैदी म्हणून सजा भोगत असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या मुलांचे आहे. मुलांना पाहताच कैद्यांचेही डोळे पाणावले.  येरवडा कारागृहामध्ये पाच वर्षे वा त्याहून अधिक तसेच जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या कैद्यांसाठी ‘मुलांशी गळाभेट’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

अतिरिक्त पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, ‘‘या उपक्रमामुळे बंदी आणि पाल्य यांचे भावनिक नाते सुदृढ होण्यास मदत  होते. मुलांसाठी परत जायचेय, ही सकारात्मक भावना त्यांच्या कारागृहातील वागण्यामध्ये सकारात्मक परिवर्तन आणते.’’ कारागृह अधीक्षक यू. टी. पवार म्हणाले, ‘‘हा उपक्रम राज्यातील प्रत्येक कारागृहामध्ये राबवला जाणार आहे.’’

मुलांना भेटण्यासाठी अर्धा-एक तास भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. १९५ कैद्यांची मुलांशी भेट झाली. साधारण २५० मुलांनी आपल्या वडिलांशी भेट झाली. काही ज्येष्ठ कैद्यांनी आपल्या नातवंडांनाही भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या नातवंडांनाही भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी उपअधीक्षक दिलीप वासनिक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रदीप जगताप आदी उपस्थित होते. यावेळी कैदी आणि त्यांची मुले खूप खुश दिसत होते. कैद्यांनी स्वतः काम करून मिळवलेल्या पैशातून जेलच्या कॅन्टीनमधील खाऊ आपल्या मुलांना भरवला. क्षुल्लकशा रागामुळे आपले व आपल्या कुटुंबीयांचे आयुष्य बरबाद झाल्याचे उद्गार काही कैद्यांनी काढले. त्यांना झालेला पश्‍चात्ताप त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांच्या कुटुंबियांनी ही सजा कधी एकदा संपतेय, असे वाटत असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.