अवजड वाहनांचा विळखा

अवजड वाहनांचा विळखा

विश्रांतवाडी - येरवडा- नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात वर्दळीच्या काळातही अवजड वाहने ये-जा करीत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत तिघांना प्राण गमवावा लागला असून, डंपरच्या धडकेमुळे भाग्यश्री रमेश नायर या युवतीचा नुकताच बळी गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने नगर रस्ता आणि शास्त्रीनगर चौकात सोमवारी (ता. २३) सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा या कालावधीत सर्वेक्षण केले असता अनेक त्रुटी निदर्शनास आल्या.

मृत तरुणीला न्याय द्यावा
वाळू-खडी वाहतूक करणारे डंपर आणि अवजड वाहनांना वर्दळीच्या कालावधीत बंदी आहे. तरीही अवजड वाहतूक सुरूच असल्यामुळे अपघात होतात. डंपरच्या धडकेने नुकताच भाग्यश्री नायर या तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे रहदारीच्या वेळेत या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी. तसेच, या अपघाताची चौकशी करून मृत तरुणीला न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  

नगर रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. त्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी असल्याने वाहतूक नियंत्रण करताना ताण येतो. अपघात घडू नयेत, यासाठी वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येते. मात्र, वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
- भागवत मिसाळ, वरिष्ठ निरीक्षक, येरवडा वाहतूक विभाग 

सर्वेक्षणात आढळलेल्या त्रुटी...

 येरवडा- नगर रस्त्यावर डंपर आणि अवजड वाहनांना सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ या वेळेत बंदी आहे. तरीही वाळू, सिमेंटची वाहतूक करणाऱ्या डंपर, माल वाहतूक करणारे ट्रक या वेळेत ये-जा करतात.
 शास्त्रीनगर चौकातील बेशिस्त वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
 बेशिस्त वाहनचालक, वाळू-विटा वाहून नेणारे डंपर, ट्रक, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे थांबणारी वाहने, रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभ्या असणाऱ्या खासगी बसेस आणि त्याकडे दुर्लक्ष करून एका कोपऱ्यात झाडाखाली थांबलेला वाहतूक पोलिस असे दृश्‍य दिसून आले.
 शास्त्रीनगर चौकात रस्त्यातच एक झाड आणि पाणपोई आहे. तेथेच विजेचा खांबही रस्त्यावर आहे. बीआरटीमुळे रस्ता अरुंद झाला असून या चौकाकडून गोल्फ क्‍लबकडे जाणारी वाहने चुकीच्या पद्धतीने वळतात. त्यामुळे सरळ जाणाऱ्या वाहनांना वळण लक्षात येत नाही. 
 गोल्फ क्‍लबकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. तेथे खासगी बसेस उभ्या केल्या जातात. अनधिकृत स्टॉल आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
 रामवाडी येथील पुलाचे काम सुरू असल्याने तेथील वाहतूक या रस्त्यावर आली. त्यातून वाहतुकीवरील ताण वाढला असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

नागरिक म्हणतात...
शास्त्रीनगर चौकातून सतत डंपर आणि ट्रक जात असतात. त्याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसते. तसेच ट्रॅव्हल्स गाड्या कशाही थांबलेल्या असतात. येरवड्यापासून वाघोलीपर्यंत उड्डाण पूल झाला तर वाहतूक सुरळीत होईल.
- प्रसाद गायकवाड

येरवडा- नगर रस्त्यावर वाहनचालक नियमच पाळत नाहीत. या भागात आयटी पार्क झाल्यामुळे वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे दररोज सायंकाळी वाहतूक कोंडी होते. शास्त्रीनगर ते गोल्फ क्‍लब चौक या रस्त्यावर अनधिकृत स्टॉल्स आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. नागरिकांना रस्ता ओलांडणे अवघड जाते.
- स्मिता लोंढे

हा चौक मोठा असल्यामुळे वाहनचालकांना सिग्नल नीट दिसत नाहीत. नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. कॉल सेंटरच्या गाड्यांमुळे वाहतूक वाढली आहे. आगाखान पॅलेसकडून येणाऱ्या चालकांना या चौकात गोल्फ क्‍लबकडे जाणारे वळण लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनचालक पुढे येऊन वळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघाताची शक्‍यता वाढते.
- फ्रान्सिस अलमेडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com