'बलाढ्य सत्तेसमोरसुद्धा साहित्यच श्रेष्ठ'

Vishwa Punjabi Sahitya Sammelan
Vishwa Punjabi Sahitya Sammelan

पुणे - ""देशात आज विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होत आहे, मात्र अशा काळातही योग्य संस्कार महत्त्वाचे ठरतात. देशाला एक योग्य दिशा देण्याचे कार्य साहित्य करते. केवळ व्यक्तिगतच नव्हे; तर राष्ट्रीय जीवनसुद्धा साहित्यातून समृद्ध होत असते. सत्ता कितीही बलाढ्य असली, तरी साहित्य हे कधीही श्रेष्ठच आणि बलशाली ठरते. आर्थिक संपन्नतेचे अनेकानेक दाखले दिले तरीही मूल्याधिष्ठित समाजासाठी सकस साहित्याला पर्याय नाही,'' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे केले. 

गुरू गोविंदसिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त "सरहद' संस्थेतर्फे आयोजित पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, संमेलनाध्यक्ष सुरजीतसिंग पातर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, "सरहद'चे संजय नहार, भारत देसडला, एस. तारासिंग, पी. एस. पसरिचा आदी उपस्थित होते. या वेळी अभिनेते धर्मेंद्र यांना "विश्‍व पंजाबी गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

गडकरी म्हणाले, ""अलग भाषा, अलग देश; फिर भी हमारा एक देश' हीच आपल्या देशाची नेहमी ओळख राहिली आहे. त्याचा दाखला जगात दिला जातो. विविधतेत एकता असण्याचा आपल्या देशाचा हा "पोत' आपण यापुढेही असाच मजबूतपणे टिकवायला हवा. महाराष्ट्रात पुरुषार्थ जागवण्याचे जे काम शिवाजी महाराजांनी केले, तेच काम पंजाबात गुरू गोविंदसिंगांनी केले. पंजाबी बांधवांकडून आम्हाला शौर्य जागविण्याची प्रेरणा मिळते. नव्या पिढीपर्यंत आपला जाज्वल्य इतिहास पोचायला हवा. वाईट विचार नष्ट करण्यासाठी व चांगले विचार देण्यासाठी साहित्य महत्त्वाचे आहे.'' 

धर्मेंद्र म्हणाले, ""मी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा होतो; पण माझी स्वप्न आकाशाला गवसणी घालावी, अशी होती. लहानपणी पाहिलेले हे स्वप्न महाराष्ट्रात आल्यामुळे पूर्ण झाले, हे मी कधीही विसरू शकत नाही. महाराष्ट्रानेच खऱ्या अर्थाने मला कुशीत घेतले आणि माझ्यावर भरभरून प्रेम केले. 

दरम्यान.'' दत्तोबा पाचंगे यांच्या चौघडावादनाने संमेलनाची दिमाखात सुरवात झाली. सुमारे 11 देशांतून रसिकांची उपस्थिती संमेलनास लावली. मराठी अन्‌ पंजाबी बांधवांसह इतरही भाषक नागरिकांची मोठी गर्दी गणेश कला-क्रीडा मंचाच्या आवारात पाहायला मिळाली. "जय महाराष्ट्र, जय पंजाब, जय भारत!' असा जयघोषही अनेकदा कानांवर पडत होता. 

"भारतीय' हीच खरी असावी ओळख... 

शरद पवार म्हणाले, ""महाराष्ट्रात अनेक राज्यांचे लोक महाराष्ट्राला आपलं समजून राहतात. इथल्या विकासात योगदान देतात. त्यांचा दृष्टिकोन हा एखाद्या राज्यापुरता संकुचित नसून "भारतीय' असाच असतो. हेच महाराष्ट्राचे खरे महत्त्व आहे. जगात ज्यांनाही बंधुता हे तत्त्व प्रिय आहे, ते सारेच गुरू नानक यांच्या विचारांना पुढे नेत आहेत... मग भले ते पंजाबी असतील किंवा अजून कोणत्याही जाती-धर्माचे. आज मराठी-पंजाबी नात्याचे नवे पर्व रुजत आहे.'' 

साहित्याला भाषेचे बंधन नाही... 

""शौर्यासोबत विवेक, हिमतीसोबत न्याय आणि साहसासोबत ममत्व हे गुरू गोविंदसिंग यांच्या विचारांचं महत्त्व आहे. त्यांच्या विचारांत एकात्मतेची बीजं रोवलेली आहेत. अभिव्यक्त होण्यासाठी भाषा हे माध्यम असते; पण साहित्याला भाषेचे बंधन नसते,'' असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com