पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मुसंडी

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मुसंडी

पिंपरी -  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीवार्दाने भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला निर्माण केलेले तगडे आव्हान बऱ्यापैकी कामी आले आहे. पिंपरी- चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावरच आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दुपारी तीनपर्यंत हाती आलेल्या निकालामधून भाजपने तीन जागांवरून थेट ३० जागांपर्यंत मुसंडी मारल्याचे चित्र आहे. 

राष्ट्रवादीचे उमेदवार २२ ठिकाणी आघाडीवर होते. दरम्यान, ५० जागांचा आकडा ओलांडू, असा आत्मविश्‍वास आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही अत्यंत कडवी झुंज दिली आहे. शिवसेनेची अपेक्षित कामगिरी मात्र दिसली नाही. काँग्रेस, मनसे, एमआयएम यांना आपले साधे खातेही उघडता आले नाही.

१२८ पैकी भोसरी प्रभाग क्रमांक ६(क) मधून भाजपचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे १२७ जागांवर निवडणूक झाली. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हॅटट्रिक करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

आज सकाळी ११ ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालात शहरात तीस ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर होती. चार पॅनेल पूर्ण विजयी झाले होते. भोसरी गावठाण (प्रभाग क्रमांक ७), मासुळकर कॉलनी (प्रभाग क्रमांक ९), तळवडे (प्रभाग क्रमांक १२), काळेवाडी (प्रभाग क्रमांक २२) मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा मोठ्या फरकांनी पराभव केला. 

आमदार लांडगेंना विलास लांडेंकडून धोबीपछाड
भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या भोसरी गावठाणातील निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. माजी आमदार विलास लांडे यांनी आमदार लांडगे यांना अक्षरशः धोबीपछाड दिला. प्रभाग सातमधून संतोष लांडगे, सुनित लांडगे, सोनम गव्हाणे आणि नगरसवेक जालिंदर शिंदे यांनी भाजप, शिवसेना उमेदवारांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक नऊमधून नगरसवेक समीर मासुळकर, राहुल भोसले, माजी महापौर वैशाली घोडेकर आणि गीता मंचरकर यांनी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांचा धुव्वा केला. प्रभाग क्रमांक १२ मधून सर्व नवीन उमेदवार असलेले प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, पौर्णिमा सोनवणे आणि संगीता ताम्हाणे यांनी भाजप, शिवसेना, काँगेसचा सुपडा साफ केला. काळेवाडीत राष्ट्रवादीने झेंडा रोवला. तिथे प्रभाग २२ मधून नगरसेवक विनोद नढे, विमल काळे, नीता पाडाळे, संतोष कोकणे हे जिंकले.  

धावडे वस्तीत भाजप भक्कम
शहरात भाजपचा विस्तार करणारे दिवंगत ॲड. अंकुश लांडगे यांच्या भोसरी धावडे वस्तीमध्ये भाजपचेच वर्चस्व कायम राहिले. तिथे त्यांचे पुतणे रवी लांडगे यांची अगोदरच बिनविरोध निवड झाली. या प्रभागातील अन्य तीनही भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने जिंकले. त्यामध्ये लांडगे यांच्याशिवाय यशोदा बोईनवाड, सारिका लांडगे, राजेंद्र लांडगे हे जिंकले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

चऱ्होलीत भाजप ३, राष्ट्रवादी १
अगदी सुरवातीला प्रभाग क्रमांक तीन (चऱ्होली) मधील निकाल हाती आले. चार जागांपैकी तीन भाजप आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. त्यात भाजपचे नगरसेवक नितीन काळजे यांच्यासह सुवर्णा बुरडे आणि साधना तापकीर यांनी बाजी मारली. त्यांनी अनुक्रमे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी नगरसेवक घनशाम खेडेकर, नगरसेविका मंदा आल्हाट आणि नवखे उमेदवार संजय पठारे यांचा पराभव केला. शिवसेनेचे धनंजय आल्हाट यांनी काळजे यांना कडवी झुंज दिली.

खासदार बारणे यांना धक्का 
पद्‌मजी पेपर मिलच्या प्रभाग २४ मधून खासदार बारणे यांना धक्का बसला आहे. येथे शिवसेनेच्या उमेदवारांसाठी आग्रही असलेल्या बारणेंना भाजपने जोरदार शिकस्त दिली आहे. येथे शिवसेनेला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. या प्रभागात अ-गटातून शिवसेनेचे सचिन भोसले तर ड-गटातून नीलेश बारणे विजयी झाले, तर ज्येष्ठ नगरसेविका व भाजप पुरस्कृत उमेदवार झामाबाई बारणे व विद्यमान नगरसेविका माया बारणे शिवसेनेच्या अनुक्रमे दीपाली गुजर व शालिनी गुजर यांना हरवून विजयी झाल्या, त्यामुळे खासदार बारणे ज्या ठिकाणी राहतात, तेथेच शिवसेनेच्या दोन उमेदवारांना पराभूत व्हावे लागले आहे.

चिंचवडगावात भाजपला दोन, तर राष्ट्रवादी, सेनेला प्रत्येकी एक जागा
पिंपरी - भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या चिंचवड गावात भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. येथे राष्ट्रवादीला एक तर शिवसेनेला एक जागा मिळाली. ड गटात भाजपचे राजेंद्र गावडे यांनी चुरशीच्या लढतीत विजय गावडे यांचा पराभव केला, तर अ गटात भाजपचे सुरेश भोईर यांनी विद्यमान नगरसेवक ॲड. संदीप चिंचवडे यांचा पराभव केला. ब गटात माजी महापौर अपर्णा डोके यांनी भाजपच्या माधुरी गुरव यांचा पराभव केला, तर क गटात शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांनी राष्ट्रवादीच्या सरोज माने यांचा दारुण पराभव केला. येथे पूर्ण पॅनेल विजयी व्हावे, यासाठी भाजपने शिकस्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com