पुणे : राष्ट्रवादीला दे धक्का!

पुणे : राष्ट्रवादीला दे धक्का!

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औंध-बोपोडी प्रभागात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना धूळ चारली. या प्रभागात भाजपने दमदार वाटचाल करीत संपूर्ण प्रभागात कमळ फुलवले. माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांच्या पत्नी नगरसेविका संगीता गायकवाड यांचा ब गटात भाजपच्या अर्चना मधुकर मुसळे यांनी पराभव केला, तर अ गटात नगरसेविका अर्चना कांबळे यांचा भाजप-आरपीआय युतीच्या उमेदवार सुनीता परशुराम वाडेकर यांनी पराभव केला. गेल्या निवडणुकीतील पराभव वाडेकर यांनी धुऊन काढला. मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवक प्रकाश ढोरे यांनी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक कैलास गायकवाड यांचा पराभव केला. महापौर प्रशांत जगताप यांनी आपली जागा राखली आहे. चुरशीच्या या लढतीत त्यांनी भाजपचे उमेदवार प्रसाद होले यांचा पराभव केला आहे. जगताप यांच्या मातुःश्री रत्नप्रभा जगताप याही पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा महापालिकेत पोचल्या आहे. या प्रभागातील इतर दोन जागा मात्र भाजपने आपल्याकडे खेचल्या आहेत. ब गटात कालिंदी पुंडे तर अ गटात धनराज घोगरे हे दोन्ही भाजपचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग २४ मध्ये रामटेकडी-सय्यदनगर मध्ये अपक्ष उमेदवार अशोक कांबळे, राष्ट्रवादी पुरस्कृत रुकसाना इनामदार आणि राष्ट्रवादीचे फारूक इनामदार यांनी बाजी मारली. 

शहराच्या मध्यवस्तीत भाजपने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवत आपले प्रभाग दणदणीत मतांनी निवडून आणले. प्रभाग क्रमांक १५ शनिवारपेठ -सदाशिव पेठ प्रभागात मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांचा पराभव करून भाजपच्या गायत्री खडके-सूर्यवंशी विजयी झाल्या. भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी विजयाची हॅटट्रिक करीत दणदणीत विजय मिळवला. नगरसेवक हेमंत रासने यांनी विजयाची परंपरा कायम राखली. ड गटात राजेश ऐनपुरे यांनी विजय मिळवून अनेक दिवसांपासूनची महापालिकेत जाण्याची इच्छा पूर्ण केली आहे. कोथरूड मध्येही भाजपने शिवसेनाला पराभवाचा धक्का देत विजयश्री खेचून आणला आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये मंजूश्री खर्डेकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे आणि आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रतिष्ठेची जागा बनविलेले जयंत भावे विजयी झाले आहेत. प्रभाग १० मध्ये बावधन-कोथरूड डेपो या प्रभागात कमळ फुलले आहे. तेथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. 

पर्वती विधानसभा मतदारसंघातही भाजपने आपला दबदबा कायम ठेवत पहिल्या फेरीत आघाडी घेतली. काँग्रेसने प्रतिष्ठेची केलेली सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर प्रभागात भाजपने दणदणीत विजय मिळवला. नगरसेवक श्रीनाथ भिमाले, पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, नगरसेविका कविता वैरागे आणि राजश्री शिळीमकर यांनी या प्रभागात विजयाची परंपरा कायम राखली आहे. कोंढव्यात शिवसेनेला धक्का देत प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादीचे गफूर पठाण, परवनी शेख, हमीदा सुंडके हे विजयी झाले आहेत. याच प्रभागात मनसेने पुण्यातील पहिले खाते उघडले असून, साईनाथ बाबर यांच्या इंजिनाची शिट्टी वाजली आहे. माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी प्रभाग क्रमांक ३८ मध्ये विजय मिळवला; पण त्यांना संपूर्ण प्रभाग विजयी करण्यात यश आले नाही.  या प्रभागात धनकवडे यांच्यासोबत प्रकाश कदम विजयी झाले. तर, भाजपच्या मनीषा कदम आणि राणी भोसले यांनी महिलांच्या गटात बाजी मारली. वडगावशेरीत कळस-धानोरीतही भाजपला यश मिळाले आहे. या प्रभागात किरण जठार, मारुती सांगडे, अनिल टिंगरे यांनी विजय मिळवला आहे, तर रेखा टिंगरे यांची एकमेव जागा राष्ट्रवादीला राखता आली. 

अरविंद शिंदे यांचा विजय
महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. या प्रभागात बहुजन समाज पक्षाने त्यांना जोरदार टक्कर दिली. शिंदे यांच्या सोबत लता राजगुरू, राष्ट्रवादीचे प्रवीण गायकवाड, चाँदबी नदाफ विजयी झाले.

पाचव्यांदा महापालिकेत 
प्रभाग क्रमांक ३ विमाननगर-सोमनाथनगर मध्ये ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी हे सलग पाचव्यांदा विजयी झाले. त्यांनी भाजपचा संपूर्ण पॅनेल निवडून आणला. श्‍वेता खोसे, मुक्‍ता जगताप आणि राहुल भंडारे हे सहकारी विजयी झाले. कर्णेगुरुजी सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक म्हणून महापालिकेत असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com