मतदार याद्या अद्ययावतीकरणाची जिल्हा प्रशासनाकडून मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पुणे - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या अद्ययावतीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीत नावे नोंदविणे; तसेच मृत, दुबार, स्थलांतरित मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्यात येणार आहेत. मतदार यादीतील दुबार अथवा समान नावे असलेल्या मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जाऊन पडताळणी करणार आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह उपस्थित होत्या. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीचे पुनर्निरीक्षण सुरू करण्यात आले आहे. मतदार यादीतील दुबार अथवा समान नावे संगणक प्रणालीद्वारे शोधली जाणार आहेत. अशी नावे आढळल्यास त्या मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदारांकडून यादीतील नाव वगळण्यासाठीचा अर्ज भरून घेतला जाणार आहे.''

मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणि नव्याने माहिती घेण्यासाठी बीएलओ घरोघरी जाणार आहेत. मतदार यादीत नाव नसल्यास त्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. ही मोहीम 20 जून 2018 पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात 7 हजार 534 बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ओळखपत्रही देण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.

Web Title: voting list modified district administrative campaign